Pune : शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी आधीच केली होती नरेंद्र दाभोळकर यांची रेकी

एमपीसी न्यूज – डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. नरेंद्र दाभोळकरांवर गोळी झाडणाऱ्याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सचिन अंदुरे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. औरंगाबादमधून सचिन अंदुरेला सीबीआयने ताब्यात घेतले आहे. तब्बल 5 वर्षानंतर दाभोळकर प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 


सचिन अंदुरे हा मूळचा औरंगाबादचा राहणारा आहे. त्याला औरंगाबादच्या निराला बाजारमधून अटक करण्यात आली आहे. निराला बाजारमध्ये कापडाच्या दुकानात तो अकाऊंटंट म्हणून काम करत होता. त्याचे आई-वडील हयात नसून  पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसोबत तो कुंवारफल्ली येथे राहतो. २० अॅगस्ट २०१३ ला नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी एकाने हत्येत आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. अवैध शस्त्रसाठ्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या एका आरोपीचा देखील दाभोळकरांच्या हत्येत हात असल्याची कबूली चौकशी दरम्यान मिळाली आहे.

दरम्यान, शरद कळसकर याने नरेंद्र दाभोळकर यांची रेकी केली होती. तेव्हा कोणत्या वेळेस कुठे जातात ? कोणाला भेटतात? कोणत्या वेळेस एकटे असतात ? कोणत्या वेळेस त्यांच्या आजूबाजूला कोण नसतं ? या सर्वाची रेकी शरद कळसकर याने केली होती. याच रेकीच्या आधारे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी पहिल्यांदा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न फसला आणि २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी  नरेंद्र दाभोळकर मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्या दिशेने बाईक चालवत शरद कळसकर आला होता आणि त्याच्या मागे बसलेल्या सचिन अंदुरेने नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या आणि पळून गेले.

पुढे जाऊन त्यांनी ठरल्या प्रमाणे या हत्येत वापरलेली बाईक, पिस्तूल आणि कपडे हे नष्ट करण्यासाठी दिले की यांनीच ते नष्ट केले याचा तपास आता एटीएस आणि सीबीआय करत आहेत. पण महत्वाचे म्हणजे या हत्येकरता बाईक आणि पिस्तूल पुरवले कुणी ? याचा तपास देखील सीबीआय करत असून याआधी अटक केलेल्या विरेंद्र तावडे याने त्याची बाईक पनवेलहून पुण्याला नेली होती ती हीच बाईक आहे का ? जी शरद आणि सचिनने वापरली होती. याबद्दल तपास सुरू आहे. दरम्यान, रात्री सचिन अंदुरेची सीबीआयने झाडाघडती घेतली. थोड्याच वेळात सचिन अंदुरेला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.