Pune : शरद पवार यांच्यामुळे माझा राजकीय पुनर्जन्म झाला – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज – महात्मा फुले यांच्या बरोबर सर्व जाती-धर्माचे लोक काम करत होते, कारण सत्य हीच त्यांची जात होते आणि सत्य हाच त्यांचा धर्म होता. खुद्द शरद पवार यांचे आई-वडील देखील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते आणि त्यामुळेच शरद पवार यांनी देखील जाती धर्माचा भेद बाजूला सारून समाजकारण आणि राजकारण केले. त्यांच्यामुळेच माझा राजकीय पुनर्जन्म झाला, असे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक येथील समता भूमी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या १२९ व्या स्मृती दिवसानिमित्त आयोजित समता दिन कार्यक्रमात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी भुजबळ बोलत होते. रूपये एक लाख (१,००,०००), मानपत्र, मानचिन्ह, फुले पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, पंकज भुजबळ, प्रा. हरि नरके, ज्येष्ठ उद्येजक दिपक कुदळे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, सुनील सरदार, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, लीला सबनीस, प्रा. रतनलाल सोनाग्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, फुलेवाडा हे आपले शक्तिकेंद्र आहे. त्या फुले वाड्याच्या समता भूमीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना आज महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला, ही विशेष बाब आहे. तुकारामाच्या गाथाचे वाचन ख्रिश्चनांच्या पंढरीत पोहोचविणारा माणूस अशी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ओळख आहे. ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जागतिक परिषदेत त्यांनी तुकाराम गाथेचे वाचन केले. कारण त्यांच्या विचारात, लेखनात आणि आचारात समतेचा विचार आहे.

पुरोगामी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने सतत आपल्या मनात ओठात आणि कृतीत फुले-शाहू- आंबेडकरांचा विचार कायम जोपासला पाहिजे. प्रबोधनकार ठाकरे हे देखील ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे समर्थक होते. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील कुठल्याही जातीपातीचा भेदभाव न मानता अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी दिली. त्यापैकी मीदेखील एक आहे.

आमचे नवे सरकार शेतकरी, बेरोजगार, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील सर्व तत्वे हीच आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममधील प्राधान्यक्रम असणार आहेत.

यावेळी बोलताना फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणाले की, प्रभू येशू ख्रिस्ताचे मुक्तीचे तत्वज्ञान हीच महात्मा फुलेंची शिकवण होती. ईश्वराला निर्मिक असे संबोधणारे महात्मा फुले प्रभू येशू ख्रिस्ताचे कट्टर समर्थक होते. कारण जाती- धर्मापलीकडे जाऊन समतेचा जो विचार येशू ख्रिस्तांनी मांडला तोच समतेचा विचार फुले दाम्पत्याने आचरणात आणला. व्देषावर उभे असलेले समाजकारण आणि राजकारण टिकत नाही. महात्मा फुले यांनी 1883 साली शेतकऱ्यांचा आसूड ओढला, मात्र महाराष्ट्रातील शेतकरी आज आत्महत्या करतात, ही महाराष्ट्रासाठी अतिशय गंभीर बाब आहे. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नव्या सरकारने प्राधान्याने योजना करावी. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्राची निर्मिती हे आपले ध्येय असले पाहिजे. महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसूड हे जागतिक दर्जाचे अभिजात साहित्य असून त्याचा इंग्रजीसह विविध परकीय भाषांमध्ये देखील अनुवाद झाला पाहिजे.

यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, समाजकारण आणि राजकारण या दोन्ही दिशांनी समतेचा विचार अभिप्रेत आहे. मानवतावादी विचारांची बीजे संविधानात पेरली गेली आहेत. संविधानातील हा मानवतावाद जीवंत ठेवण्यासाठी देश आणि राज्यातील सत्ता फुलेवादी विचारांच्या प्रचारकांच्या हाती असणे गरजेचे आहे. आज त्याची नांदी होत आहे, याचा आनंद आहे. आजचे पुरस्कारार्थी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने केलेला विरोध हा बिनबुडाचा होता. कारण दिब्रिटो हे महात्मा फुले यांच्या विचारांचे प्रचारक आहेत.

या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो फुले-शाहू- आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून येणाऱ्या समता ज्योतीचे स्वागत महात्मा फुले वाडा येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार लडकत यांनी केले, तर प्रितेश गवळी यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.