Pimpri News : शेती,कारखानदारी, आयटी क्षेत्र अशा विविध क्षेत्रांवर शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

एमपीसी न्यूज – शरद पवार यांनी रहाटणी येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शेती, कारखानदारी, आयटी क्षेत्र अशा विविध क्षेत्रांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कृषिमंत्री असतानाच्या काही बाबी उलगडून सांगितल्या. ‘माझ्याकडे दहा वर्ष देशाच्या शेती खात्याची सूत्रे होती. ज्या दिवशी माझ्याकडील शेती खात्याचे काम संपले त्या दिवशी भारत जगातील 18 देशांना निर्यात करणारा देश म्हणून जगात भारताचा गौरव झाला, असे पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, सन 2004 साली देशाच्या शेती खात्याचे काम माझ्याकडे आले. एके दिवशी संध्याकाळी माझ्याकडे एक फाईल आली. ती फाईल आजच्याआज पूर्ण करा अशी सूचना देखील आली. देशात फक्त चार आठवडे पुरेल एवढाच अन्नसाठा आहे. त्यामुळे परदेशातून धान्य आणावं, असा प्रस्ताव त्या फाईलमध्ये होता. मी सही केली नाही. विचार केला की, देशातील ७० टक्के लोक शेतकरी आहेत आणि आम्ही देशाला अन्न देऊ शकत नाही. दुस-या दिवशी मनमोहन सिंग यांचा फोन आला आणि यांनी प्रस्ताव मंजूर करण्यास आग्रह केल्याने मी नाईलाजाने त्या फाईलवर सही केली.

पण त्यानंतर मी हे चित्र बदलण्याचा निर्धार केला. सन 2004 ते 2014 ही दहा वर्ष माझ्याकडे शेती खात्याची सूत्रे होती. ज्या दिवशी माझ्याकडील शेती खात्याचे काम संपले त्या दिवशी भारत जगातील 18 देशांना निर्यात करणारा देश म्हणून जगात भारताचा गौरव झाला. एक काळ असा होता की भारत तांदूळ थायलंड मधून आयात करत होता. ज्या दिवशी मी शेती खात्याचे काम सोडले त्या दिवशी भारत हा सर्वाधिक तांदूळ निर्यात करणारा जगातील देश झाला. जगात दुस-या क्रमांकाची साखर निर्यात करणारा देश भारत आहे. फळे आणि भाजीपाला निर्यातीत भारत दुस-या क्रमांकावर आहे. पूर्वी घरातील कोणी आजारी असेल तरच फळे आणली जात. पण आता फळे मुबलक प्रमाणात आहेत. मिळालेली सत्ता शेतक-यांच्या हितासाठी वापरण्याचे ठरवले तर हा शेतकरी ठरवलं तर जगाच्या भुकेचा प्रश्न सहज सोडवू शकतो. ते काम आम्ही केलं आहे. भाजप सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही.

हिंजवडी येथे साखर कारखान्याच्या भुमीपूजनाला मला बोलावण्यात आले होते. त्यावेळी मी ‘या ठिकाणी कारखाना येणार नाही’ असे सांगितले. मी तुम्हाला साखर कारखान्याला दुसरी जागा देतो इथे आयटी पार्क येईल असे सांगितले. आज लाखो तरुण तरुणी आयटी क्षेत्रात पिंपरी चिंचवड शहरात काम करत आहे. सध्या केंद्र सरकार याबाबतीत योग्य पावलं उचलतंय असं दिसत नाही, अशी टीका देखील पवार यांनी केली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सूत्रे आहेत. औद्योगिक धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, आताचे राज्य सरकार त्या दृष्टीने पावले टाकत आहे, अशी कौतुकाची थापही पवार यांनी राज्य सरकारला दिली.

उद्योग क्षेत्राबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, उद्योगांचे विकेंद्रीकरण करताना पिंपरी चिंचवड शहरात कारखाने काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेकांनी मुंबईच्या वागळे इस्टेट मध्ये कारखाने सुरू केले. जमशेदजी टाटा यांनी त्यांचा वाहन तयार करण्याचा कारखाना जमशेदपूरला नेत आहे, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांची भेट घेऊन टाटा कारखाना पिंपरी चिंचवड शहरात आणण्याची विनंती केली आणि टाटा कंपनी शहरात आली. अशीच परिस्थिती इतर अनेक कंपन्यांची आहे.

महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा आजारी होत्या. त्यांना आजारपणातून बाहेर पाडण्यासाठी विशिष्ट औषधाची गरज होती. त्यामुळे कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. त्यानंतर अशी परिस्थिती देशातील सर्वसामान्य नागरिकांवर येऊ नये म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी तात्काळ निर्णय घेऊन पिंपरी येथे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच ए) कंपनी सुरू केली. या कंपनीने पेनिसिलीन संपूर्ण देशाला पुरवण्याचे काम केले आहे.

नोकरीमध्ये कन्फर्मेशन ही संकल्पना असता कामा नये, असा विचार सध्याचे केंद्र सरकार करत आहे. कामगारांच्या हिताच्या विरोधात आताचे केंद्र सरकार आहे. त्यांना सत्तेवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. कारखानदारी वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. मी मुख्यमंत्री असताना अनेक नवीन कारखान्यांना शहराच्या आसपास जागा दिल्या. रांजणगाव, चाकण, भोसरी, जेजुरी, कुरकुंभ, बारामती, इंदापूर, शिरवळ ही महत्वाची औद्योगिक केंद्र झाली आहेत. पण कारखानदारांना अनुकूल अशी नीती आताचे केंद्र सरकार घेत नसल्याचेही पवार म्हणाले.

मी निर्धार केलाय – पवार

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावं, लोकांचं सुखदुःख समजून घ्यावं. देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांचं सहकार्य नसलं की सामान्य माणसांना येणारी दुःख कमी करण्यासाठी सर्वांच्या मदतीने काम करण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात जाण्याचे ठरवले. मागील काही दिवसांपूर्वी सोलापूरला भेट दिली आणि तिथल्या सर्व स्तरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आता पिंपरी चिंचवड शहरात आलो आहे. महाराष्ट्रात शक्य तेवढ्या ठिकाणी जाण्याचा मी निर्धार केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.