Pimpri News : भाजप म्हणजे देशावर आलेले संकट – शरद पवार

एमपीसी न्यूज – भाजप म्हणजे देशावर आलेले संकट आहे, ते संकट घालवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायचं आहे, असे आवाहन शरद पवार यांनी रहाटणी येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या विरोधात असल्याची टीका देखील पवार यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने केली.

कामगारांच्या हिताच्या विरोधात आताचे केंद्र सरकार आहे. त्यांना सत्तेवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. जगात किंमत वाढली म्हणून देशात इंधन वाढले हे कारण सांगितले जात आहे. पण जगात किंमत कमी झाली तरी देशातली इंधन दरवाढ वाढतच आहे. इंधनाच्या किमतीत 25 टक्के कमी केली तरी चालण्यासारखे आहे. याबाबत पी चिदंबरम यांनी लेख लिहिला आहे, असा दाखला शरद पवार यांनी यावेळी दिला.

शरद पवार म्हणाले, “मी तुम्हाला खात्री देतो, आता सत्ता त्यांच्या हातात असेल. पण केंद्र सरकारचे हे वागणे फार काळ राहणार नाही. आपण सगळ्यांनी जागृत राहणं गरजेचं आहे. भाजप हे देशावर आलेलं संकट आहे. ते संकट घालवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायचं आहे.”

इंधन दरवाढीबाबत बोलताना पवार म्हणाले, “पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती फार वाढल्या आहेत. हे महागाईचं सरकार आहे. जगात किंमत वाढली म्हणून देशात इंधन दर वाढले हे कारण सांगितले जात आहे. परंतु जगात किंमत कमी झाली तरी देशातली इंधन दरवाढ वाढतच आहे.” यावेळी पवार यांनी पी चिदंबरम यांच्या लेखाचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांच्या विरोधाभास वागणूकीचा प्रत्यय आणून दिला.

दरम्यान, पिंपरी – चिंचवड शहराचा चेहरा ज्यांनी बदलण्याचे काम केले त्यांच्या हाती आत्ता सत्ता नाही. आता ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी सत्तेचा पूर्णपणे गैरवापर केला. याच गोष्टी घराघरातून ऐकायला मिळत आहे. या शहराचे नेतृत्व योग्य हातात देण्याचे काम नागरिकांनी करावे. जे शहराची लूट करतात त्यांना खड्यासारखे बाजूला करायला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.