Sharad Pawar News : कोरोना रुग्णवाढ चिंताजनक; जनतेने सरकारला सहकार्य करावे – शरद पवार

0

एमपीसी न्यूज – कोरोनाची रुग्णवाढ ही अतिशय चिंताजनक बाब आहे. कोरोना साथीला घालवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. राज्य सरकार ते घेत आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार्य करावे, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आज (गुरुवारी, दि. 8) जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पवार यांनी सुरुवातीला राज्यातील काही शहरांमधील कोरोनाची आकडेवारी सांगितली. त्यातून कोरोनाची परिस्थितीत भयानक असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, “सध्या सुरु असलेली कोरोना साथीची एवढी गंभीर आणि भयावह स्थिती आजवर नव्हती. सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या परिस्थितीला तोंड द्यायला हवे. राज्यातील डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र कष्ट करत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

रुग्णांसाठी बेड्स आणि इतर पायाभूत सुविधांचा प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे नाईलाजाने राज्य सरकारने तज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. यासाठी केंद्र सरकारचा देखील आग्रह आहे.

परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार आणि सर्व यंत्रणा काम करत आहे. केंद्र सरकार देखील यासाठी राज्यांना सहकार्य करत आहे. काल मी देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला. कमतरतेबाबत चर्चा केली. त्यात त्यांनी विश्वास दिला की, केंद्र सरकार या संकटातून सावरण्यासाठी राज्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. आपल्या सामुहिक प्रयत्नातून आपल्याला मार्ग काढून पुढे जायचं आहे. निर्बंध आल्यास अस्वस्थता येतेच.

व्यापारी, हमाल, कामगार, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकाला या संकटामुळे मोठ्या प्रमाणात झळ बसली आहे. दुकाने बंद झाल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान आहे. फळे आणि नाशवंत वस्तू तयार करणा-या शेतक-यांना अडचण येत आहे. या सगळ्यातून आपण पुढे जात आहोत. यशसिद्धीला जायचं असेल तर धैर्यानं सामोरं गेल्याशिवाय पर्याय नाही.

माझी समाजातील सर्व घटकांना विनंती आहे, आपल्याला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अपरिहार्य निर्णय राज्य सरकारला घ्यावेच लागतील. ते घेतले जात आहेत. त्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिस्थितीतला तोंड देण्यासाठी सहकार्य करा. मला विश्वास आहे, राज्यातील सर्व घटकातील नागरिक एकजूट होऊन प्रयत्न करतील. सामुहिक प्रयत्नातून आपण कोरोना घालवू आणि नागरिकांची सुटका करू.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment