Pimpri : वंचितांच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळावा – शरद पवार  

एमपीसी  न्यूज –   आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. लक्ष्मण माने यांच्यासारख्या काही व्यक्ती वंचित समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. वंचितांसाठी झटणाऱ्या चांगल्या प्रवृत्तीही समाजात आहेत. त्यामुळे वंचितांसाठीचे हे कार्य असेच पुढे सुरू ठेवायला हवे,” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

जकातवाडी (ता. सातारा) येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात फुले-आंबेडकर साहित्य पंचायत, भटक्या विमुक्त जमाती संघटना व भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्थेच्या वतीने दिला जाणारा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

पुरस्काराचे स्वरुप (मानचिन्ह व १० हजार रुपये रोख), जीवनगौरव पुरस्कार अंकुश काळे (मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख) व युवा साहित्य पुरस्कार सुप्रिया सोळांकुरे (मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख) यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, लक्ष्मण माने आदी उपस्थित होते.

अंकुश काळे हे पारधी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, शरद पवार म्हणाले, “वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्धीची अपेक्षा नसते. या घटकांचे भले होण्यातच त्यांना समाधान असते. त्यासाठी कोणी लेखणीतून, तर कोणी साहित्यातून, तर कोणी प्रत्यक्ष काम करून आपल्या भावना रेखांकित करतात.”

अरुण खोरे म्हणाले, “सर्व चळवळीत एका व्यक्तीवर कायम अन्याय झाला आहे. ते म्हणजे महात्मा गांधी होय. गांधीजींना अस्पृश्य न ठेवता चळवळींशी जोडून घेतले पाहिजे. त्यासाठी वैचारिक सांधेजोड झाली पाहिजे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.