Pune : शरद पवार-उद्धव ठाकरे प्रथमच एकाच व्यासपीठावर तर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे गुफ्तगू

एमपीसी न्यूज – राजकारणात कोणीही कोणाचे कधी कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात. त्याचाच प्रत्यय बुधवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रथमच एकाच व्यासपीठावर आले. दोघांनीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून साखर पेरणी केली.

कमीत कमी आमदारांत शरद पवार यांनी चमत्कार करून दाखविल्याचे उद्धव म्हणाले. आता कोणाच्या जास्त जागा आहे आमचेच पीक येणार असे कोणी म्हणू शकत नाही. आम्ही कमी जागांमध्ये तुमच्यावर मात करू शकतो हे दाखवून दिले, अशा शब्दांत उद्धव यांनी भाजपवर बाण सोडला. यावेळी शरद पवार यांनीही उद्धव हे शब्द पाळणारे मुख्यमंत्री असल्याचे सांगत भाजपवर हल्लाबोल केला.

तर, याच व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नावाची पाटी बदलून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शेजारी बसविले. कार्यक्रम संपेपर्यंत दोघांनीही एकमेकांच्या कानांत गुफ्तगू केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दोघांनीही एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. आज दोघेही खुलेआम चर्चा करीत असल्याने खमंग चर्चांना उत आला होता. तर, दुसरीकडे माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीही शरद पवार यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.