Maval: शरद पवार यांची पार्थ यांच्यासाठी माघार – जयंत पाटील

'गवयाचे पोर रडलं तरी गायल्यासारखे वाटते' पार्थ यांच्यावर जयंत पाटील यांचा कौतुकाचा वर्षाव

एमपीसी न्यूज – भक्कम पाठिंबा हवा असेल तर मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शेकापनेच मागणी केली होती. एका घरातील तीन उमेदवार देणार नसल्याचे सांगत शरद पवार यांनी पार्थसाठी स्वत: निवडणुकीतून माघार घेतल्याचे, शेकापचे सरचिटणीस, आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच ‘गवयाचे पोर रडलं तरी गायल्यासारखे वाटते’ असे म्हणत पार्थ यांच्यावर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

डांगे चौक येथे पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, भक्कम पाठिंबा हवा असेल तर पार्थ पवार यांना शेकापनेच उमेदवारी देण्याची मागणी केली होती. पार्थ तरुण चेहरा आहे. त्यामुळे लोकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. शेकापमुळेच पार्थ यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी माघार घेतली आहे. विद्यमान खासदारांपेक्षा लोकसभेत पार्थ प्रभावीपणे काम करु शकतील, हे खात्रीशीपरपणे सांगू शकतो. सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच लोकसभेत पार्थ काम करतील असा मला ठाम विश्वास आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पार्थ पवार राजकारणात नवखे आहेत. त्यामुळे पहिले भाषण करताना चुकले असतील. म्हणून ते चांगले काम करु शकणार नाहीत, असे होत नाही.

पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांना बुथनिहाय काम करण्याचा आदेश दिला आहे. शहरात चांगले संघटन उभे केले आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसेल, असेही पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादीला जागा मिळतील. नेहमी बलशाली माणसावरच प्रहार केला जातो. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत असल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.