Pune: चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचे कौतुक, राजकीय चर्चेला उधाण

Sharad Pawar's appreciation from Chandrakant Patil, political discussions going on  आम्ही शरद पवार यांच्यावर टीका त्यांचा आदर राखूनच करीत असल्याची सारवासारवही त्यांनी केली. असे असले तरी राज्य सरकार गोंधळून गेले आहेत.

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कामाचा वेग प्रचंड आहे. या वयात सुद्धा त्यांनी दोन दिवस कोकणात मुक्कामी राहून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यांना मानलं पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचे कौतुक केले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत जवळीक वाढल्याची कुजबुज सुरू झाली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ सुरू असल्याची टीका महाविकास आघाडीवर केली होती.

त्यानंतर पवार यांनी त्यावर आम्हाला विदूषक हवा, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यावर परत चंद्रकांत पाटील यांनी टीका करीत महाराष्ट्रात सर्कस सुरू असल्याचे पवार यांनी मान्य केल्याचा पलटवार केला होता.

त्याला काही दिवस जाताच लगेचच चंद्रकांत पाटील यांनी अचानकपणे पलटी मारून पवार यांच्या कोकण दौऱ्याचे गुणगान गायले. त्याबद्दल खमंग चर्चांना ऊत आला आहे.

पाटील हे नेहमीच राष्ट्रवादीच्या निशाण्यावर असतात. यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये चंद्रकांत पाटील सहकारमंत्री असताना ते शरद पवार यांचे नेहमीच मार्गदर्शन घ्यायचे. पवार यांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास महत्वपूर्ण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आम्ही शरद पवार यांच्यावर टीका त्यांचा आदर राखूनच करीत असल्याची सारवासारवही त्यांनी केली. असे असले तरी राज्य सरकार गोंधळून गेले आहेत. कोरोना, चक्रीवादळ, शिक्षण अशा कोणत्याच क्षेत्रात सरकार ठोस निर्णय घेत नाही.

त्यामुळे या सरकारला शरद पवार मार्गदर्शन करीत नसल्याचे टीकास्त्रही चंद्रकांत पाटील यांनी सोडले. ही एक प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच चपराक असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.