Pimpri : ईडी, शिडी, शिंगं काय वापरायचं ते वापरा पण उद्धव ठाकरे यांचे सरकार पाच वर्षे राहणारच – शरद पवार

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने अनिल देशमुख, अनिल परब, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, भावना गवळी या सगळ्यांकडे ईडी लावली. पण यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने केंद्राने आता अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. माझं स्पष्ट सांगणं आहे, तुम्ही काय ईडी, शिडी, शिंगं काय वापरायचं ते वापरा. तुम्ही कितीही त्रास दिला तरी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाच वर्ष राहणारच, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली.

रहाटणी येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी पवार बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले, “केंद्र सरकारचे काम राज्याला मदत करण्याचे असते. आज केंद्र सरकारची राज्याला मदत होत नाही. राज्याचे पैसे मिळत नाही. जीएसटीची राज्याची 30 हजार कोटींची रक्कम केंद्राकडे पडून आहे. ती महाराष्ट्राला केंद्र सरकार रक्कम देत नाही. महाराष्ट्राला एका बाजूने आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करायचा. तर दुसऱ्या बाजूला हे राज्य सरकार पाडण्यासाठी काय करता येईल, हे प्रयत्न करीत आहेत.

सीबीआय, ईडी, नार्कोटिक्स या सगळ्या एजन्सीचा वापर महाराष्ट्रातील सरकारमध्ये बसलेल्या लोकांना संकटात आणण्यासाठी केला जात आहे. अनिल देशमुख गृहखात्याचे मंत्री होते. त्यांच्यावर आरोप झाला. त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि म्हणाले चौकशी करा. ज्या पोलिसाने आरोप केला त्याला काहीच आधार नव्हता. त्यानंतर अनिल देशमुख गायब झाल्याचे उठवले. अनिल परब, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, भावना गवळी या सगळ्यांकडे ईडी लावली. पण यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने केंद्राने आता अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. माझं स्पष्ट सांगणं आहे, काय तुम्ही ईडी, शिडी, शिंगं काय वापरायचं ते वापरा. तुम्ही कितीही त्रास दिला तरी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाच वर्ष राहणारच, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.