Pune News : बिहार निकालानंतर फडणवीस यांना शरद पवार यांचा खोचक टोमणा!

एमपीसी न्यूज : बिहार निवडणुकीचे प्रचारप्रमुख म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड भाजपने केली होती. या निवडणुकीत भाजपची चांगली कामगिरी ही फडणवीस यांच्या नियोजनामुळे झाल्याचे बोलले जात आहे, तुमचे यावर मत काय, असा प्रश्न विचारल्यावर पवारांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उत्तर देत”आमच्या डोक्यात ही गोष्ट आली नव्हती. ती आणून दिल्याबद्दल धन्यवाद,” असे खोचक टोमणा मारल्यावर उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

पुण्यातील हडपसर येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद शाधताना शरद पवार म्हणाले, बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान, बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सर्व नेते प्रचारामध्ये होते. तर दुसर्‍या बाजूला एक अनुभव नसलेला तरुण नेता तेजस्वी यादव निवडणूक लढवत होता. त्यामुळे तेजस्वी यादव यांना जेवढ्या काही जागा मिळतायत ती त्यांची मोठी कामगिरी म्हणावी लागेल.

तेजस्वी यांच्या या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल आणि इतरांनाही मार्ग दिसेल, अशा शब्दांत त्यांनी निकालवरील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काही जागा लढवत होती. परंतु तेजस्वी यादव यांना मदत व्हावी यासाठी आम्ही या निवडणुकीकडे फारसे लक्ष दिलं नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच बिहारमधील निवडणूक निकालाचा परिणाम इतर राज्यांवर कसा होईल हे, सांगता येणार नाही. तामिळनाडूमध्ये तर परिणाम होईल, असे वाटत नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काय होईल हे बघावे लागेल, असे पवारांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.