BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गजराज महालात मंडईचे शारदा-गजानन दिमाखात विराजमान

विविध ठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत ; बीव्हीजीचे हणमंत गायकवाड यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना 

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया चा गजर आणि ढोल-ताशा, बँडच्या निनादाने मंडईचा परिसर दुमदुमून गेला. आकर्षक फुलांनी सजलेल्या रथात शारदा-गजाननाची आगमन मिरवणूक काढण्यात आली. अखिल मंडई मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त चौका-चौकात गणपतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीनंतर चैतन्यमयी वातावरणात गजराज महालात शारदा-गजाननाचे दिमाखात आगमन झाले आणि दुपारी १.१५ वाजता बीव्हीजीचे हणमंत गायकवाड यांच्या हस्ते शारदा-गजाननाची विधीवत प्राणप्रतिष्ठापना झाली.
यावेळी अखिल मंडई मंडळाचे मधुकर सणस, कांताभाऊ मिसाळ, काशीनाथ सोनावणे, माऊली टाकळकर, मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, संजत मते, राजेश करळे, तुषार शिंदे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिरापासून सकाळी १०.४५ वाजता आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. शारदा-गजाननाच्या मूर्तीचे लोभस रुप कॅमेरॅमध्ये टिपण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप रामेश्वर चौक, गोटीरामभैय्या चौक, झुणका भाकर केंद्रामार्गे उत्सव मंडपात झाला. मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय कला अकादमीच्या कलाकारांनी रंगावलीच्या पायघड्या घातल्या. तसेच न्यू गंधर्व बँड, गर्जना ढोल-ताशा ध्वज पथक, नू. म. वि. वाद्यपथक ट्रस्ट, शिवगर्जना पथक सहभागी झाले होते. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांनी पौरिहित्य केले.
शारदा-गजाननाचा वाढदिवस सोहळा शुक्रवारी (दि.१४, सप्टेंबर)
अखिल मंडई मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शारदा गजाननाचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी माव्याच्या मोदकाच्या आकाराचा १२५ किलोचा केक तयार करण्यात आला असून फिनोलेक्सचे प्रकाश छाब्रिया व रितु छाब्रिया हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
HB_POST_END_FTR-A4

.