India vs England : शार्दुल ठाकूर, बुमराह आणि उमेशमुळे भारताची चौथ्या कसोटीत वापसी

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : कसोटी क्रिकेटची खरी गम्मत काय असते याची पावलोपावली प्रचिती आज असंख्य क्रिकेट रसिकांना चौथा कसोटी सामना बघत असताना प्रत्येक चेंडू गनिक आली.

तिसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळवून आत्मविश्वास  बुलंद असलेला इंग्लंड कर्णधार जो रूट याने आज नाणेफेक जिंकताच भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंड संघाने आज ख्रिस वोक्सला संघात स्थान दिले तर भारतीय संघाने उमेश यादव व शार्दुल ठाकुरला संघात स्थान दिले.

या दौऱ्यात बऱ्यापैकी फॉर्मात वाटणाऱ्या सलामी जोडीने बऱ्यापैकी सुरुवात केली. जवळपास चारच्या प्रतिषटक सरासरीने धावा जमा करत त्यांनी पहीली काही षटके खेळून काढली आणि ते स्थिरावले असे वाटत असतानाच घात झाला आणि रोहित शर्मा पहिल्या गड्याच्या रुपात ख्रिस वोक्सच्या एका चेंडूवर पायचीत बाद झाला. त्यानंतर राहूल सुद्धा 17 धावावर बाद झाला.

संघाच्या यावेळी केवळ 28 धावाच झाल्या होत्या. यानंतर कर्णधार कोहली आणि पुजारा दोघे संघाला सावरतील असे वाटत असतानाच पुजारा सुद्धा अँडरसनच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देऊन बाद झाला आणि यातच कोहलीने एक धक्कादायक निर्णय घेतला. त्याने रहाणेला खेळवण्याऐवजी चक्क जडेजाला बढती दिली. याने रहाणेला काय आणि किती धक्का बसला हे त्यालाच माहिती पण टीव्हीवर समालोचन करणाऱ्यांना तरी हा निर्णय काही योग्य वाटला नाही. रहाणे सारख्या फलंदाजाला जर अंतिम संघात खेळवायचे असेलच तर त्याला आम्ही तुझ्या पाठिशी ठाम आहोत हे पटवून द्यायला हवे ना की असा खेळ त्याच्यासोबत करायला हवा.

मात्र ही खेळी काही फारशी योग्य ठरली नाही आणि जडेजा केवळ दहा धावा काढून बाद झाला. दुसऱ्या बाजूने कोहली मात्र आज बऱ्यापैकी खेळत होता, त्याने रहाणेच्या साथीने संघाला शंभरी गाठून दिली खरी पण याचदरम्यान संघाची धावसंख्या 105 असताना वैयक्तिक अर्धशतक काढून तो ही रॉबिनसनच्या चेंडूवर यष्टीरक्षक बेअरस्टो कडे झेल देऊन बाद झाला. या धक्क्यातून सावरत नाही तोवरच पंत आणि रहाणे सुद्धा पाठोपाठ खराब फटक्यावर स्वस्तात बाद झाले आणि भारतीय संघ 150 तरी धावा करेल का अशी आशंका मनात येऊ लागली.

पण दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या शार्दुल ठाकूरच्या मनात मात्र काहीतरी तुफानी करावे असेच होते. आणि त्याने मनातले सत्यात उतरवून चक्क आयन बोथम, कपिल देव यांच्या नावावरच्या विक्रमाला निस्तनाबूत करत केवळ 31 चेंडूत इंग्लंड मधले सर्वात तेज अर्धशतक करत आपले पुनरागमन सार्थ ठरवले. तीन उत्तुंग षटकार आणि सात जबरदस्त चौकार मारत त्यानें तुफानी 57 धावा करुन संघाला 191 पर्यंत पोहचवले.

त्याच्या विकेट नंतर बुमराह आणि उमेश लगेचच बाद झाले आणि इंग्लंडचा डाव सुरू झाला. इंग्लिश गोलंदाजानी परिस्थितीचा अनुकूल फायदा उठवत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. पुनरागमन करणाऱ्या ख्रिस वोक्सने शानदार गोलंदाजी करत चार बळी मिळवले तर त्याला साथ देताना रॉबिनसंने सुध्दा तीन बळी मिळवले.

भारतीय संघाला स्वस्तात बाद केल्याने खुशीत असलेल्या इंग्लिश फलंदाजाने मात्र पुढे काय मांडले असेल याची कल्पना केवळ काहीच षटकात देताना जसप्रीत बुमराहने रोरी बर्न्सला त्रिफळा बाद करत तर त्याचा दुसरा जोडीदार हशीब हमीद पंतच्या अप्रतिम झेलाच्या जोरावर तंबूत पाठवून मोठे धक्के दिले. मात्र या मालिकेत डोकेदुखी ठरलेल्या जो रूट आणि मलानने  46 धावांची बऱ्यापैकी जलद भागीदारी करत डाव सावरलाय असे वाटत असतानाच उमेश यादवने एका अप्रतिम इनस्विंगवर जो रूट ला त्रिफळा बाद करत इंग्लंड संघाला तिसरा आणि मोठा धक्का देत भारतीय संघाला आजच्या दिवसाच्या अखेर या सामन्यांत वापस आणले आहे, असे म्हटले तर ते जराही चुकीचे ठरणार नाही.

इंग्लंड संघ सुद्धा जो रूटच्या बळावरच आतापर्यंत उड्या मारत होता. दिवसअखेर डेव्हिड मलान आणि ख्रिस ओव्हर्टनने आणखी पडझड होवू दिली नाही आणि संघाला अर्धशतकी धावसंख्याही गाठून दिली. फलंदाजीतल्या अपयशाने गलीतगात्र झालेल्या भारतीय संघाला गोलंदाजाने नवचैतन्य मिळवून दिले आहे. उद्या आणखी काही बळी दिवसाच्या सुरुवातीत मिळवून भारतीय संघ इंग्लिश संघाला रोखण्यासाठी प्रयत्नशील राहील तर इंग्लिश फलंदाजी आपल्याला आघाडी कशी मिळवता येईल यांसाठी झुंज देईल. एकंदरीतच पहिल्या दिवसापासूनच ही कसोटी रंगतदार होईल असे चिन्ह दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.