Chinchwad News : ‘ती’ होतेय वासनांधतेची शिकार; 12 महिन्यात बलात्काराच्या 164 घटना

पिंपरी-चिंचवडमध्ये दर दोन दिवसाला घडतेय बलात्काराची एक घटना

एमपीसी न्यूज – वासनांध पुरुषी अहंकार आणि मानसिकतेच्या गराड्यात ती अजूनही अडकली आहे. विश्वास संपादन करून, लग्न, मैत्री अशी वेगवेगळी आमिषे दाखवून तिच्या स्वप्नांचा चुराडा केला जातो. नंतर तिच्यावर बलात्कार करून तिच्यासह तिच्या भावनांना देखील कुस्करले जाते. जानेवारी ते डिसेंबर 2021 या वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल 164 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. अनेक घटनांमध्ये घटना घडल्यानंतर काही दिवसांनी गुन्हा दाखल केला जातो. सन 2020 मध्ये बलात्काराचे 160 गुन्हे दाखल होते. त्यात दोन गुन्ह्यांची वाढ मागील वर्षी सन 2021 मध्ये झाली आहे.

अल्पवयीन मुली, तरुणी तसेच विवाहित महिलांना लग्नाचे आमिष दाखवले जाते. लग्नाची भुरळ पाडून नवीन स्वप्ने दाखवली जातात. त्यात त्यांना अडकवून त्यांच्या मनाच्या विरोधात जाऊन त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले जातात. आपली कामवासना शमवल्यानंतर तिच्या मतांचा, तिच्या स्वप्नांचा आणि एकंदर तिचा विचार केलाच जात नाही. त्यानंतर मग अशी प्रकरणे पोलीस दप्तरी दाखल केली जातात.

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फूस लाऊन पळवून न्यायचे. त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आणि काही दिवसांनी लग्न न करता परत घरी यायचे. असेही प्रकार शहरात घडले आहेत. 164 बलात्कारांच्या घटना म्हणजे प्रत्येक दोन दिवसाला एक बलात्काराची घटना शहरात घडत आहे. हे प्रमाण भयंकर आहे.

दाखल असलेल्या 164 घटनांपैकी 19 घटना अशा आहेत, ज्या घटना घडल्यानंतर तात्काळ दाखल केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे खालील आकडेवारीमध्ये 19 घटनांची तफावत आहे. खालील आकडेवारी ही त्याच महिन्यात घडलेल्या आणि दाखल झालेल्या घटनांची आहे.

वर्षभरात बलात्काराच्या दाखल झालेल्या घटना –
जानेवारी – 14
फेब्रुवारी – 18
मार्च -14
एप्रिल – 7
मे – 9
जून – 8
जुलै – 13
ऑगस्ट – 10
सप्टेंबर – 13
ऑक्टोबर – 14
नोव्हेंबर – 9
डिसेंबर – 16

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.