Vadgaon Maval : टाकवे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर निवारा शेड; ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील लसीकरण केंद्राबाहेर निवारा शेड उभारण्यात आला आहे. लसीकरण करण्यासाठी येणा-या नागरिकांना रांगेत उभे राहताना निवारा नसल्याने नाहक त्रास होत होता. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, ज्योती आंबेकर यांनी वारंवार पाठपुरावा करून कंपनीच्या सीएसआर फंडातून निधी आणून निवारा शेड उभारल आहे. यामुळे दोन्ही सदस्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

टाकवे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांना रांगेत उभे राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याचे प्रसिद्धी माध्यमांनी अनेक वेळा स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना भर पावसात उभे राहावे लागत असे. या ठिकाणी कोणता निवारा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती याबाबत टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या ज्योती दिलीप आंबेकर व आरोग्य समिती प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शांताराम असवले यांनी याविषयी माहिती घेऊन महिन्द्रा ॲक्सेलो कंपनीच्या व्यवस्थापनशी चर्चा करुन सीएसआर फंडाच्या माध्यमातून निवारा शेडची मागणी केली.

यामागणी संदर्भात कंपनी व्यवस्थापन समितीने अनुकूलता दर्शवत तात्काळ कामाला मंजुरी देऊन अवघ्या चार दिवसात उत्तम दर्जाचे निवाराशेड उभारण्यात आले आहे सदर कामाच्या गतीने गावातील नागरिक सुद्धा अचंबित झाले असुन काम करुन घेण्याबाबत टाकवे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांचे गावात सर्वत्र कौतुक होत असुन नागरिकांच्या समस्या ही सोडवण्यासाठी सर्वानीच या पद्धतीने काम करण्याची तयारी दर्शवली तर गावच्या विकासासाठी मोठा हातभार लागू शकतो अशा भावना सर्व सामान्य नागरिक व्यक्त करत आहे.

यावेळी सोमनाथ असवले म्हणाले की, “सर्वत्र कोरोना लसीकरण होत असुन टाकवे येथे नागरिकांची मोठी गर्दी होत होती. परंतु त्यांना रांगेत उभे राहण्यासाठी निवारा शेड नसल्याने अनेकदा नागरिक नाराजी व्यक्त करत होते याबाबत महिन्द्रा ॲक्सेलो कंपनीकडून आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले व अवघ्या चार दिवसात शेडची उभारणी करुन देताआली.”

ज्योती आंबेकर म्हणाल्या “लसीकरणासाठी महिला, नागरिक व वयोवृद्ध नागरिक रोज याठिकाणी येत असतात परंतु निवाराशेड नसल्याने अनेक महिला लसीकरण न करता माघारी जात होत्या याबाबत माहिती घेऊन मंहिन्द्रा ॲक्सेलो कंपनीच्या माध्यमातून दीड लाख रुपयांचा सीएसआर फंड मिळवून काम पुर्ण करण्यात आले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.