Shirgaon News: लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

एमपीसी न्यूज – शिरगाव येथे साई सत्यम लॉज लॉजिंग अँड बोर्डिंग येथे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली. तसेच पाच महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.

ही कारवाई सोमवारी (दि. 27) दुपारी साडेचार वाजता करण्यात आली. प्रसन्नाकुमार मंजुनाथ शेट्टी (वय 47, रा. तळेगाव दाभाडे), रॉकी कुमार गुप्ता, दिनेश अमरनाथ शेट्टी (वय 41, रा. मोहननगर, चिंचवड), सुधाकर श्याम शेट्टी (वय 40, रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सोनाली माने यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिरगाव येथे साई सत्यम लॉज लॉजिंग अँड बोर्डिंग हा लॉज चालवत होते. त्यामध्ये आरोपींनी पाच महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी आणले होते. त्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत, त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपी उपजीविका भागवत होते.

याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. सोमवारी दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी साई सत्यम लॉज लॉजिंग अँड बोर्डिंग या लॉजवर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी पाच महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. आरोपी प्रसन्नाकुमार याला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी 23 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.