Maval News : शिरगाव पोलिसांनी चार लाखांचा गुटखा पकडला

एमपीसी न्यूज – चारचाकी वाहनातून गुटखा विक्री करण्यासाठी जात असलेल्या एका वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये सुमारे चार लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच वाहन चालक आणि गुटखा खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 29) दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास उर्से गावात करण्यात आली.

वाहन चालक शिवलाल मोहनलाल राठोड (वय 39, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), गुटखा खरेदी करणारा सैफ अब्दुल सत्तार उद्दीन (रा. उर्से, ता. मावळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह गुटखा मालक नरेशी देवाशी (रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई समाधान फडतरे यांनी शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवलाल याने आरोपी नरेशी देवाशी यांच्या मालकीचा तीन लाख 95 हजार रुपये किमतीचा गुटखा चारचाकी वाहनातून विक्री करण्यासाठी नेला. हा गुटखा आरोपी सैफ याला विकण्यात येणार होता. याबाबत शिरगाव पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी उर्से गावाच्या हद्दीत सापळा लावून कारवाई केली.

यामध्ये तीन लाख 95 हजार रुपये किमतीचा गुटखा आणि तीन लाख दहा हजार रुपये किमतीची कार असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच वाहन चालक आणि गुटखा खरेदी करणारा व्यक्ती या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.