Shirgaon Police Station News : शिरगाव-परंदवाडी पोलीस ठाण्याला राज्याच्या गृह विभागाची मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील आणखी एका पोलीस ठाण्याला राज्याच्या गृह विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे विभाजन करून शिरगाव-परंदवाडी पोलीस स्टेशन तयार करण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिली आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 22) उशिरा अध्यादेश काढण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत रावेत, शिरगाव, बावधन, महाळुंगे यासह पाच नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यातील रावेत आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता शिरगाव-परंदवाडी पोलीस ठाण्याला देखील मान्यता मिळाली आहे.

प्रस्तावित शिरगाव-परंदवाडी पोलीस ठाण्यासाठी एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नऊ पोलीस हवालदार, 18 पोलीस नाईक, 36 पोलीस शिपाई, दोन सफाई कामगार असे एकूण 75 पोलीस अधिकारी, कर्मचा-यांची आवश्यकता आहे.

शिरगाव-परंदवाडी पोलीस ठाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील मंजूर संख्याबळातून एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नऊ पोलीस हवालदार, नऊ पोलीस नाईक, सात पोलीस शिपाई अशी एकूण 29 पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तर उर्वरित दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नऊ पोलीस नाईक, 29 पोलीस शिपाई, दोन सफाई कामगार अशी एकूण 46 पदे तीन टप्प्यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या मनुष्यबळातून पुरविण्यात येणार आहेत.

नवनिर्मित शिरगाव-परंदवाडी पोलीस ठाण्यासाठी 25 लाख 51 हजार 400 रुपयांच्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये दोन जीप, एक पाच टनी वाहन, 10 मोटारसायकल, 25 टेबल, 75 खुर्ची, 15 स्टील कपाट, 10 लाकडी बेंच, 10 लाकडी स्टूल, तीन वॉकीटॉकी सेट, सात संगणक, सात प्रिंटर, सात संगणक टेबल, सात संगणक खुर्ची, चार दूरध्वनी संच आदी बाबी या अनावर्ती खर्चातून घेतले जाणार असल्याचे गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे. नवनिर्मित शिरगाव-परंदवाडी पोलीस ठाण्यासाठी येणारा अनावर्ती खर्च पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उपलब्ध मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा, असे आदेशात सूचित केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.