Shirur : शिरुरमध्ये 59.46 टक्के मतदान; आंबेगावमध्ये सर्वाधिक 70.29 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण 59.46 टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 70.29 टक्के तर सर्वांत कमी हडपसर मतदारसंघात 47.84 टक्के मतदान झाले आहे. आंबेगावचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे. डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांना कडवे आव्हान दिले आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. आढळराव यांच्या आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक 70.29 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे हे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसर हे सहा मतदारसंघ येतात. जुन्नर विधानसभा मतदारसंघात एक लाख 93 हजार 965 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये एक लाख 4 हजार 827 पुरुष मतदारांनी तर 89 हजार 93 महिला मतदारांनी आपला हक्क बजाविला असून एकूण 64.90 टक्के मतदान झाले आहे.

आंबेगाव मतदारसंघात एक लाख 97 हजार 52 मतदारांनी आपला हक्क बजाविला. त्यातील एक लाख 6 हजार 735 पुरुष तर 90 हजार 317 महिलांनी मतदान केले आहे. सर्वाधिक 70.29 टक्के मतदान आंबेगावमधून झाले आहे. खेड-आळंदी मतदारसंघात दोन लाख 2 हजार 740 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामध्ये एक लाख 13 हजार 725 पुरुष तर 89 हजार 15 महिला मतदारांनी मतदान केले असून एकूण 62.76 टक्के मतदान झाले आहे.

शिरुर विधानसभा मतदारसंघातील दोन लाख 27 हजार 541 मतदारांनी आपला हक्क बजाविला. त्यामध्ये एक लाख 27 हजार 370 पुरुष तर एक लाख 170 महिला मतदारांनी आपला हक्क बजाविला आहे. एकूण 61.52 टक्के मतदान झाले आहे. भोसरी मतदारसंघातील दोन लाख 37 हजार 767 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये एक लाख 35 हजार 539 पुरुष तर एक लाख 2 हजार 223 महिला मतदारांनी मतदान केले असून एकूण 57.48 टक्के मतदान झाले आहे. तर, हडपसर मतदारसंघातील दोन लाख 33 हजार 316 मतदारांनी मतदान केले आहे. त्यामध्ये एक लाख 29 हजार 874 पुरुष तर एक लाख 3 हजार 442 महिला मतदारांनी आपला हक्क बजाविला असून एकूण 47.84 टक्के मतदान झाले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण 21 लाख 73 हजार 484 मतदार आहेत. त्यामध्ये 11 लाख 44 हजार 795 पुरुष आणि 10 लाख 28 हजार 645 महिला मतदार आहेत. यापैंकी 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी आपला हक्क बजाविला आहे. सात लाख 18 हजार 115 पुरुष आणि 5 लाख 74 हजार 260 महिला मतदारांनी मतदान केले असून एकूण 59.46 टक्के मतदान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.