Shirur: लोकसभा लढविणार का? विलास लांडे म्हणतात..परिवर्तनासाठी कामाला लागलोय!

एमपीसी न्यूज – देश आणि राज्यात परिवर्तनाची नांदी असून परिवर्तन होणार आहे. लोकसभेचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निश्चित करणार आहेत. शिरुर मतदारसंघात पक्ष अन्‌ परिवर्तनासाठी मी कामाला लागलो आहे. पक्षाचे अध्यक्ष यांनी आदेश दिल्यास तो पाळणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार की नाही? याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी शिरुर आणि मावळ मतदारसंघातून पक्षाचा खासदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने पक्षाने कामाला देखील सुरुवात केली आहे. पक्षाच्या नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत शिरुर लोकसभा मतदारसंघातून विलास लांडे यांना कामाला लागण्याचे निर्देश दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. लांडे देखील विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधात बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी लांडे यांना निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत पत्रकारांनी विचारले असता विलास लांडे म्हणाले, देश आणि राज्यात परिवर्तनाची नांदी असून परिवर्तन होणार आहे. लोकसभेचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निश्चित करणार आहेत. मी पक्षासाठी कामाला लागलो आहे. राष्ट्रवादीत पवारसाहेबांचा आदेश अंतिम असतो. त्यांचा आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पक्षाचे अध्यक्ष यांनी आदेश दिल्यास तो पाळणार असल्याचे सांगत लांडे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार की नाही? याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

  • राजकारण आज आहे उद्या नाही, नाती कायम असतात! 
    दरम्यान, भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी विलास लांडे आणि आम्ही नातेवाईक असल्याचे सांगत त्यांच्यातील राजकीय वादावर पडदा टाकला होता. याबाबत विचारले असता विलास लांडे म्हणाले, राजकारण आज आहे उद्या नाही. नाती कायम असतात. नातीगोती पाळावी लागतात. त्यांनी घेतलेली भुमिका चांगली आहे. त्यामुळे चांगलेच होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.