Shirur : राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा; ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरूच राहणार !

निवडणूक आयोगाने स्पष्ट केले

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा मिळाला आहे. डॉ. कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका निवडणुकीच्या काळातही सुरू राहणार आहे. आचारसंहितेच्या नवीन नियमावलीनुसार मालिका बंद केली जाणार नसल्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

शिरूर लोकसभा मतदारंसघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका एका खासगी वाहिनीवर सुरू आहे. डॉ. कोल्हे हे उमेदवार असल्यामुळे या मालिकेचे प्रक्षेपण थांबवावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे मतदारांवर प्रभाव पडेल अशी तक्रार करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने मात्र या मालिकेचे प्रक्षेपण थांबवणे अशक्य असल्याचे सांगितले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, ”आचारसंहितेच्या नवीन नियमावलीनुसार एकादा अभिनेता निवडणूक लढवत असल्यास त्याची एखादी मालिका खासगी वाहिनीवर सुरू असेल. तर, तीचे प्रक्षेपण थांबवता येणार नसल्याचे स्पष्ट निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही त्यांची मालिका आचारसंहितेच्या नवीन नियमावलीनुसार बंद केली जाणार नाही. तसेच मंगळवारी ‘सी व्हिजील’ अॅपवर प्राप्त झालेली कोल्हे यांच्याविरोधातील तक्रार निकाली काढण्यात आली आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.