Shirur : पूरग्रस्तांसाठी एक भाकरी, शेंगदाणा चटणी द्या ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे आवाहन

एक भाकर पूरग्रस्त बांधवांसाठी हे अभियान सुरु

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे राज्यावर पूरसंकट आले आहे. त्याचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे. पुराने दोन ते तीन लाख नागरिक बाधित झाले आहेत. त्या बांधवांना मदतीची आवश्यकता असून त्यासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघातील माय-बाप जनतेने एक भाकरी आणि शेंगदाणा चटणी, शक्य झाल्यास बिस्किटचा पुडा राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांकडे जमा करावा, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. ही मदत तातडीने पूरग्रस्त बांधवांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात अतिवृष्टी झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साता-यातील सुमारे दीड लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक नागरिक अडकून पडले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी मदतीची आवश्यकता आहे. राज्याच्या विविध भागातील सुमारे दोन ते तीन लाख नागरिक बाधित झाले आहेत. पुराने 27 जणांचा बळी घेतला आहे. तर. सुमारे अडीच लाख नागरिकांचे स्थलांतर केले आहे.

या अस्मानी संटकामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरातील भांड्यापासून, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी या बांधवांना मदतीची आवश्यकता असून माणुसकीच्या भावनेतून त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. स्थलांतरित केलेल्या बांधवांना जेवण पाठविण्यात येणार आहे. एक भाकर पूरग्रस्त बांधवांसाठी हे अभियान सुरु करण्यात येत आहे. घरटी एक भाकरी, शेंगदाण्याची चटणी आणि शक्य असल्यास बिस्किट पूडा द्यावा. ही मदत राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहचविण्यात येईल. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे. तसेच शिरुर मतदारसंघातील विविध सामाजिक संस्था, संघटना, कंपन्यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी मदत पोहोचवू शकता

जुन्नर – अतुल बेनके यांचे जनसंपर्क कार्यालय
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय
शिरुर-हवेली – अशोक पवार यांचे जनसंपर्क कार्यालय
हडपसर – खासदार डॉ. कोल्हे, नारायण लोणकर यांचे जनसंपर्क कार्यालय
भोसरी – विलास लांडे, दत्ता साने, भोसरीतील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक यांच्या जनसंपर्क कार्यालयात मदत पोहचवू शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.