Shirur: माजी लोकप्रतिनिधींनी सखोल माहिती घ्यावी, केवळ श्रेय लाटण्यासाठी उठाठेव करु नये – डॉ. अमोल कोल्हे

Former MPs should get in-depth information, not just stand up for credit - Dr. Amol Kolhe

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पामध्ये अनेक टप्पे आहेत. या टप्प्यांची माजी लोकप्रतिनिधींनी सखोल माहिती घ्यावी. केवळ श्रेय लाटण्याच्या दृष्टीने  उठाठेव करु नये, असा टोला शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाव न घेता माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना लगाविला आहे.

हा संपूर्ण प्रकल्प मागील 21 वर्ष प्रलंबित होता. 21 वर्षानंतर या प्रकल्पाला आता गती मिळत आहे, असेही डॉ. कोल्हे पुण्यात पत्रकारांशी बोलताना आज (शनिवारी) म्हणाले.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मार्गावरुन आजी-माजी खासदारांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. खासदार डॉ. कोल्हे यांच्या पुढाकारातून पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.4) मंत्रालयात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यात डॉ. कोल्हे यांना यश आले आहे. त्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी माझी 15 वर्षांची तपश्चर्या फळाला आल्याचे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

त्याला आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले. डॉ. कोल्हे म्हणाले, काही माजी लोकप्रतिनिधी असतील. त्यांनी अगोदर या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घ्यावी. हा प्रकल्प 20 टक्के राज्य, 20 केंद्र सरकार आणि 60 टक्के कर्ज उभारणीतून केला जाणार आहे. एकूण 16 हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. मंजुरी आली सांगत सगळ्यांनी सुरुवात केली.

मात्र, आता रेल्वे मंत्रालयाकडून प्रिंसिपल मान्यता आली आहे. त्यानंतर राज्य सरकारने प्रिंसिपल मान्यता दिली. कर्ज उभारणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर त्यापुढील कार्यवाही सुरु करण्यात येईल.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या-ज्या भागातून ही रेल्वे जात आहे. त्या भागातील लोकप्रतिनीधींसोबत पुन्हा एकदा प्रकल्पाचे सादरीकरण करण्याचे सांगितले आहे.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे हा संपूर्ण प्रकल्प मागील 21 वर्ष प्रलंबित होता. 21 वर्षानंतर या प्रकल्पाला आता गती मिळत आहे. ही गती मिळत असताना याला अनेक टप्पे आहेत.

यामध्ये तीन हजार 200 कोटी राज्य सरकार, तीन हजार 200 कोटी केंद्र सरकार आणि नऊ हजार 600 कोटीची कर्ज उभारणी केली जाणार आहे. या पद्धतीने हा प्रकल्प होणार आहे. सेमी हायस्पीड रेल्वे प्रतितास 200 किलो मीटर धावण्याचा हा प्रस्ताव आहे.

त्याचबरोबर प्रवासी ट्रेन आणि मालवाहतूकीसाठीची सुविधा याही गोष्टी यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.