Shirur: किल्ले लग्न समारंभासाठी देण्याचा निर्णय!; सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांचे मानबिंदू असलेले 25 किल्ले हेरिटेज हाॅटेल्स आणि लग्न समारंभासाठी दीर्घ मुदतीच्या कराराने खासगी कंपन्याना विकण्याचा सरकारचा निर्णय संतापजनक आणि निषेधार्ह असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. महाराजांच्या मावळ्यांच्या बलिदानाचा असा अपमान करण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील 353 गड किल्ल्यांपैकी 100 संरक्षित किल्ल्यांची निवड करून त्यातील 25 किल्ले खासगी उद्योगांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या उद्योगांना 60 ते 90 वर्षाच्या करारावर हे किल्ले दिले जाणार असून त्यातून राज्याचे उत्पादन वाढणार असल्याचे सांगितले जाते. यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध सुरु झाला आहे.

शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी एक-एक किल्ला, बुरुज, दरवाजा राखण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान केले. त्या बलिदानाचा असा अपमान करण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाबरोबर तह केला. तेव्हा सुद्धा जेमतेम 20 किल्ले दिले होते. औरंगजेबाला हयातीत एकही किल्ला जिंकता आला नाही. पण, दुर्दैवाने म्हणावे लागत आहे की, जे औरंगजेबाला जमले नाही ते पाच वर्षात सरकारने असा काहीतरी संतापजनक निर्णय घेऊन करून दाखविले आहे.

यासाठी राजस्थानचा संदर्भ दिला जात असून तो चुकीचा आहे. राजस्थानचे किल्ले ‘रेसिडेन्शियल फोर्ट’ होते. महाराष्ट्रातले किल्ले ‘वॉर फोर्ट’ (लढावू किल्ले) आहेत. या दोन्हीमधील फरक अगोदर समजून घेणे आवश्यक आहे. आम्ही मावळे गडकिल्ल्यावर ‘हेरिटेज हाॅटेल्स’ उभारु देणार नाहीत, असा इशाराही डॉ. कोल्हे यांनी दिला आहे.

ज्या मातीवर मावळ्यांनी बलिदान पत्करले होते. त्याच ठिकाणी लग्नाचे सोहळे रंगणार असतील. तर, सरकारने याविषयी विचार करण्याची नितांत गरज आहे. विकासाला नकार नाही. पण, हाच विकास वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. या किल्ल्यांवर, गडकोटांवर संग्रहालय उभारता येऊ शकते. शिवसृष्टी उभी राहू शकते. त्यातून पर्यटनाला वेगळी चालना मिळू शकते.

गटकोट्यांवरील वनांमध्ये अनेक जातीचे पक्षी आहेत. जीवसृष्टीचे रक्षण केले जाऊ शकते. त्यातून इतिहास शिकायला मिळेल. स्थानिक तरुणांचा रोजगार वाढेल. या पद्धतीने शाश्वत विकासाचा विचार करुन आणि त्याही पलिकडे जाऊन इतिहासाशी प्रामाणिक राहून गडकिल्यांच्या बाबतीत विचार करावा, असे आवाहनही डॉ. कोल्हे यांनी सरकारला केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.