Shirur: वाढीव वीज बिलात तत्काळ सुधारणा करा; खासदार डॉ. कोल्हे यांची उर्जामंत्र्यांकडे मागणी

Immediate correction of increased electricity bill; MP Dr. Kolhe's demand to the energy minister

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या वीजग्राहकांना केवळ सुलभ हप्त्यात बिले भरण्याची परवानगी पुरेशी नाही. तर महावितरणने पाठविलेल्या वाढीव‌ बिलात तत्काळ सुधारणा करून सुधारित बिले देण्यात यावीत, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यातील वीज ग्राहकांना सरासरी वीज बिले देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या.

त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने वीजग्राहकांना वीज वापराची बिले पाठवताना प्रचलीत स्लॅबनुसार वीज आकारणी केली. त्यामुळे ग्राहकांना वाढीव दराचा भुर्दंड पडत असल्याची तक्रार केली जात आहे.

तसेच आधी भरलेल्या सरासरी बिलांचे समायोजन केले नसल्याने बिलाची रक्कम वाढली असल्याचीही तक्रार नागरिक करत आहेत.

या संदर्भात महावितरणकडे ग्राहकांनी विचारणा केल्यावर त्यांना आधी बिलाची रक्कम भरा. पुढच्या बिलात सुधारणा करू असे सांगितले जात असल्याने वीज ग्राहकांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असल्याकडे डॉ. कोल्हे यांनी ऊर्जामंत्री राऊत यांचे लक्ष वेधले आहे.

डॉ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, केवळ हप्त्याने वीज बिल भरण्याची सवलत देणे पुरेसे नसून वाढीव दराचा भुर्दंड सोसावा लागू नये यासाठी वीज ग्राहकांना सुधारीत बिले देण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.