Shirur: खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची दखल; खोट्या दाव्याप्रकरणी ‘डीसीजीआय’ची ‘ग्लेनमार्क’ला नोटीस

Shirur: MP Amol Kolhe's complaint noted; DCGI issues notice to pharmaceutical company एका गोळीची किंमत रु.103 यानुसार 14 दिवसांच्या उपचारासाठी रु.12,500 इतका दर निश्चित केला होता.

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) ‘FABIFLU’च्या खोट्या दाव्याप्रकरणी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला स्पष्टीकरण मागविण्यासाठी नोटीस बजावली. दरम्यान, ग्लेनमार्क कंपनीने या गोळीचे दर कमी करुन 75 रुपयांवर आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

देशभरात कोविड-19चा प्रादुर्भाव वाढत असतानाच जून महिन्यात ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीने Fabiflu नावाचे अ‍ॅन्टीव्हायरल औषध बाजारात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.

यावेळी Fabiflu ही टॅबलेट उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या रुग्णांसाठी प्रभावी असल्याचा दावा केला होता. तसेच एका गोळीची किंमत रु.103 यानुसार 14 दिवसांच्या उपचारासाठी रु.12,500 इतका दर निश्चित केला होता.

ग्लेनमार्कच्या घोषणेनंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी दि. 24 जून रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे रीतसर पत्र पाठवून तक्रार केली होती. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या कोविड उपाययोजनेबाबतच्या आढावा बैठकीत ग्लेनमार्कच्या दाव्यावर आक्षेप घेतला होता.

यावेळी डॉ. कोल्हे यांनी Fabiflu या गोळीची रु.103 ही किंमत अवास्तव असून भारतातील गरीब, निम्न मध्यमवर्गीय व मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारी नसल्याचे मत व्यक्त केले होते.

त्याचबरोबर ग्लेनमार्कने केलेली चाचणी प्रोटोकॉल समरीनुसार को-मॉर्बिड परिस्थितीत Fabifluचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेली नसल्याकडे डॉ. कोल्हे यांनी सर्वांचे‌ लक्ष वेधले होते.

डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि डीसीजीआयकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत अखेर डीसीजीआयने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीकडे स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली.

दरम्यान, डॉ. कोल्हे यांनी Fabiflu गोळीच्या किंमतीबाबत घेतलेल्या आक्षेपाची दखल घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत 75 रुपये प्रती गोळी इतकी कमी केली असून आता 14 दिवसांच्या कोर्ससाठी रु.9150 इतका खर्च येणार आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी जागरुकता दाखवत कोविड रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच औषधाची किंमत कमी करण्यास भाग पाडले. त्यांच्या जागरुकतेबद्दल वैद्यकीय व्यवसायातील जाणकारांनी त्यांचे कौतुक केले आहे.

या संदर्भात डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, कोविड-19च्या वाढत्या धोक्याच्या काळात अशाप्रकारे दावे वा जाहिराती करून सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक होऊ नये. तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुणीही औषधांची अवास्तव किंमत आकारू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच ग्लेनमार्कने Fabiflu या गोळीची किंमत 75 रुपये केल्याने या लढ्याला पहिले यश मिळाले असून पुढील काळात सर्वसामान्य रुग्णांची फसवणूक होऊ नये आणि उपचाराचा खर्च आवाक्यात राहावा यासाठीचा आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.