Shirur: मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करून द्यावे – अमोल कोल्हे

Mumbai infrastructure should be made available in Pune - Amol Kolhe ; मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील बैठकीत केली मागणी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त बेड उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोरोना नियंत्रणाचे मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केली.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. या बैठकीत डॉ. कोल्हे यांनी ही मागणी केली.

यावेळी ते म्हणाले की, मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांसाठी बेडची सुविधा निर्माण केलेल्या रेल्वे बोगी, व्हेंटिलेटरसह विविध इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करून द्यावे. पुण्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी अनेक सूचना केल्या.

विशेषतः रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर आणि टाॅसिलीझुमाब या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी सरसकट या औषधाचा वापर करण्याऐवजी रुग्णाला खरोखरच त्याची गरज आहे का, याची खात्री करून या औषधांचा वापर केल्यास या औषधांचा काळाबाजार होण्यावर नियंत्रण ठेवता येईल, अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी केली.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. कोल्हे यांनी या बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांची प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक दखल घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे बैठकीत त्यांनी 3-4 वेळा डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख केला.

विशेषतः कोरोनाचा डॅशबोर्ड सातत्याने अपडेट ठेवला पाहिजे असे सुचवितांना डॉ. कोल्हे म्हणाले की, अनेकदा डॅशबोर्डवर खाटांची उपलब्धता दिसते, मात्र प्रत्यक्षात तेथे रुग्ण पोहोचतो तेव्हा खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. परिणामी रुग्णांची मोठी गैरसोय होते.

त्यामुळे डॅशबोर्ड सातत्याने अपडेट करण्याची सूचना डॉ. कोल्हे यांनी केली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे संबोधित करताना अनेकदा खासदार कोल्हे यांना आपण स्वत: डॉक्टर आहात त्यामुळे आपल्याला हे समजू शकेल असे वारंवार म्हणत होते, ही बाब उपस्थितांना जाणवत होती.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तामामा भरणे व जिल्ह्यातील खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.