Shirur : चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या आढळरावांना डॉ. कोल्हे यांनी केले क्लीन बोल्ड!

डॉ. अमोल कोल्हे ठरले जॉईंट किलर

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघातून चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना उमेदवार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी क्लीन बोल्ड केले. डॉ. कोल्हे यांनी आढळरावांचा धक्कादायक पराभव केला. आढळराव पाटील मागील 15 वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत होते. माजी शिवसैनिक आणि अभिनेते असलेल्या कोल्हे यांनी आढळरावांना चितपट करत पहिला मराठी अभिनेता खासदार होण्याचा बहुमान डॉ. कोल्हे यांनी मिळवला. एकूण 12 लाख  89 हजार 110 मतमोजणी झाली. त्यात कोल्हे यांना 6 लाख 34 हजार 108 तर पाटील यांना 5 लाख 75 हजार 279 मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल ओव्हाळ यांना 37 हजार 966 इतकी मते मिळाली. अमोल कोल्हे हे 58 हजार 829 मतांनी विजयी झाले. 

शिवाजीराव आढळराव पाटील मागील 15 वर्षांपासून खासदार होते. मागील तीन निवडणुका त्यांनी सहजपणे जिंकल्या होत्या. ते चौथ्यांदा लोकसभेत जाण्याच्या तयारीत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेत उपनेता असलेल्या डॉ. कोल्हे यांना निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी पक्षात घेऊन उमेदवारी दिली. यामुळे डॉ. कोल्हे यांच्या रूपाने आढळराव यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले होते. अभिनेते असलेल्या कोल्हे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेत मतदारसंघ पिंजून काढला होता. शिरूर मधील या लढतीकडे राज्यासह मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागले होते.

  • मतमोजणीच्या दिवशी डॉ. कोल्हे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवली होती. आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर आणि जुन्नर या विधानसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत अभिनेता असलेल्या कोल्हे यांनी मुत्सद्दी नेता असलेल्या आढळराव यांना पराभवाची धूळ चारली. नेत्यावर अभिनेता सरस ठरला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.