Shirur news: चला, यंदा साजरी करु शाश्वत शिवजयंती – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली. ती म्हणजे स्वराज्य. शिवरायांची यंदा 391 वी जयंती. यानिमित्ताने प्रत्येक गावात 391 झाडे लावू या आणि ती जगवू या. या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीच्या निमित्ताने खासदार डॉ. कोल्हे यांनी वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातत्व विभागाच्या सहकार्याने शिवनेरी गडावर 391 देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. याच संकल्पाची व्याप्ती वाढवत खासदार डॉ. कोल्हे यांनी गावोगावच्या ग्रामपंचायतींना 391 देशी झाडे लावून ती वर्षभर जगविण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रत्येक गावात 391 देशी वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेनेही सहकार्य केले असून ही झाडे लावण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत कार्यक्रम राबविण्याचे आवाहनही ग्रामपंचायतींना केले आहे.

तसेच ज्या ग्रामपंचायती या उपक्रमात सहभागी होतील त्यांनी वृक्षारोपणाची छायाचित्रे आपल्याला पाठवावीत. आपल्या फेसबुक पेजवर या ही छायाचित्रे माहितीसह प्रसिद्ध करणार असल्याचचेही खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारं प्रत्येक गाव आणि शिवभक्त या उपक्रमात सहभागी होईल. हा उपक्रम यशस्वी करुन शाश्वत शिवजयंती साजरी करतील, असा मला विश्वास आहे. त्यासाठी चला संकल्प करु या. माझी शिवजयंती… शाश्वत शिवजयंती !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.