Shirur News: विड्यांच्या बंडलवर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यास मनाई करा- डॉ. अमोल कोल्हे

साबळे आणि वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणली आहे. यामुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

एमपीसी न्यूज – साबळे आणि वाघिरे या विडी कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाजारात विडी विक्रीस आणली आहे. छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या नावाने विड्याची बंडल बाजारात आणणे हा संभाजी महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्रासह भारतातील जनतेचा अपमान आहे. त्यामुळे साबळे आणि वाघिरे विडी उत्पादक कंपनीला नोटीस पाठवावी. विड्याच्या बंडलावर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यास मनाई करा, अशी मागणी शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यात खासदार डॉ. कोल्हे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे समस्त मराठी जनतेचे स्फूर्तीस्थान आहेत. त्यांच्या नावाने विडीसारखे उत्पादन चालविणे सर्वथा अनुचित आहे.

साबळे आणि वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणली आहे. यामुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. संबंधित उत्पादकांना याबाबतची कल्पना देऊन शंभूप्रेमी मंडळींनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त करुन सदर विडीचे नाव बदलण्याची विनंती केली. परंतु साबळे आणि वाघिरे कंपनीने याला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही.

यामुळे या विषयावरुन शिवप्रेमी संघटना व जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडीसारख्या उत्पादनास असणे ही प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिकासाठी खेदाची व संतापजनक बाब आहे. यामुळे आपणास नम्र विनंती आहे की, या कंपनीला आपण विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.