Shirur news: शिरूरच्या आजी-माजी खासदारांमध्ये सोशल मीडियावर वाकयुध्द; दोघेही भाजपच्या वाटेवर असलेली बातमी व्हायरल

एमपीसी न्यूज – राज्यातील सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले तरी शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये अद्यापही विस्तव जात नाही.  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्यात सातत्याने कुरघोडीचे राजकारण सुरू असते. आता दोघेही भाजपच्या वाटेवर असलेली बातमी व्हायरल झाली आहे. त्यावरून त्यांच्यात सोशल मीडियावर वाकयुध्द रंगले आहे. या दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या नेतृत्वाबद्दल भाजप प्रवेशाची बातमी शेअर करून टीका करत असल्याने मतदारसंघात चांगलाच गोंधळ उडाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी व्हायरल होत आहे.  ‘राष्ट्रवादीतील चार आमदारांनी हैराण केल्याने अमोल कोल्हे मतदारसंघात फिरेना…अखेर भाजपच्या वाटेवर निघाले’, असे या व्हायरल बातमीत म्हटले आहे.

त्यावरून खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्यावर सोशल मीडियावरून निशाणा साधला आहे.

ती बातमी फेसबुकवर शेअर करत कोल्हे म्हणतात, ’15 वर्षे   मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक पहायला मिळाली नव्हती ! मन:पूर्वक आभार! Shivajirao Adhalrao Patil’.

दुसरीकडे, शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची बातमीसुद्धा व्हायरल होत आहे. ‘बिहार निवडणुकीनंतर शिवसेनेला खिंडार, मोहन भागवत यांची नागपूरात घेतली भेट’,असे त्या बातमीत म्हटले आहे. त्यावरून आढळराव यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा समाचार घेतला आहे.

ती व्हायरल बातमी फेसबुकवर शेअर करत आढळराव म्हणतात, ‘ज्यांनी विनोदाची सुरुवात केली. अशांवर त्यांचेच विनोद उलटल्यावर त्यांना सहनही होत नाही. अन त्रागाही करता येत नाही. मग सुरू होते आभाराची भाषा !’.

करमणूक अनं कल्पनाविस्तारात रमण्यापेक्षा मोठ्या विश्वासानं लोकांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडावी. म्हणजे जनतेत हसं होणार नाही. Dr.Amol Kolhe. माझ्याविषयी खोटी माहिती पसरवून शिरूर लोकसभेतील जनतेला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही..’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.