Shirur: शिवाजीराव आढळराव यांना पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांचे तगडे आव्हान

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार आहे. डॉ. कोल्हे यांच्या रुपाने गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी आढळराव यांना राष्ट्रवादीचे तगडे आव्हान असणार आहे. आढळराव आणि डॉ. कोल्हे यांची लढत लक्षवेधी ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीची उमेदवारी डॉ. अमोल कोल्हे यांना आठ दिवसांपूर्वीच जाहीर झाली आहे. तर, शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना आज जाहीर झाली. त्यामुळे शिरुरमध्ये दुरुंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आढळराव यांची ही चौथी निवडणूक आहे. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत प्रतिस्पर्धी तुल्यबळ नसल्याचा त्यांना फायदा झाला. पण, यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार तगडा आहे. त्यामुळे आढळराव यांनी घाम गाळावा लागणार आहे.

शिरुर मतदारसंघातील जुन्नरचे रहिवाशी असलेले शिवसेनेचे उपनेते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे या मोह-यालाच रराष्ट्रवादीने गळाला लावले. पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. दूरचित्रवाहिनीवरील छत्रपती संभाजी मालिकेच्या माध्यमातून कोल्हे घरा-घरात पोहचले आहेत. कोल्हे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच आढळराव यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत. आढळराव आणि कोल्हे यांच्यात तुल्यबळ लढाई होईल, असे जाणकारांचे मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.