Shirur: प्रशासनाने ग्रामीण भागात पुरेशा उपाययोजना कराव्यात – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्याची शक्यता आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी पुरेशी उपाययोजना जिल्हा प्रशासनाने करावी, अशी सूचना शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत केली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व रेशनिंगवरील अन्नधान्याचे वितरण अशा विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी शिरूरचे खासदार डॉ. कोल्हे, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी जुन्नर व शिरूर तालुक्यात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यानंतर तालुका प्रशासनाने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळून नियंत्रण राखले त्याबद्दल या दोन्ही तालुक्यातील अधिकारी, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, नर्सेससह विविध कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर एकूणच तेराही तालुक्यात कोरोना रोखण्यात यश मिळाल्याने प्रादुर्भाव होण्यावर नियंत्रण आले. त्यामुळे सर्वच तालुक्यातील प्रशासन यंत्रणेचे चारही खासदारांनी अभिनंदन केले.

पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे रेशनकार्ड नसलेल्या परराज्यातील व इतर जिल्ह्यांतील नागरिकांना रेशनवर धान्य देण्याची मागणी केली होती असे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, पालकमंत्री पवार यांनी जिल्ह्यासाठी 60 मेट्रीक टन धान्य उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल.

कोरोनाची लढाई लढताना दुर्गम भागातील आदिवासी क्षेत्रातील गावांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवरही उपाययोजना करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी सूचना करून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, एप्रिल महिना संपत आला आहे, मात्र त्यापूर्वीच काही आदिवासी गावांमध्ये गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली.

ऊसतोड मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यादृष्टीने तालुका प्रशासनाने काय नियोजन केले, अशी विचारणा खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. तसेच लॉकडाऊन शिथिल होणार असला तरी सर्वच तालुक्यातील प्रशासनाने सतर्क राहून कोरोना आपल्या तालुक्यात येणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. त्याचबरोबर या कसोटीच्या काळात धान्य वितरण व्यवस्था उत्तम पद्धतीने राबविली. तसेच समाजातील दुर्बल घटक, शेल्टरहोम मधील परराज्यातील रोजंदारी कामगार, शेतमजूर आदींना पुरेशा प्रमाणात मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची सर्व खासदारांनी प्रसंशा केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.