Shirur: खासदारपदावर 15 वर्ष ‘अढळ’ राहूनही विकासाची वाट लावणाऱ्यांना ग्रामसभेत जाब विचारा

राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांचे शिरूर मतदारसंघातील जनतेला आवाहन

एमपीसी न्यूज – नैसर्गिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्वच बाबतीत समृद्ध असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघाची मागील 15 वर्षात मोठी पीछेहाट झाली आहे. खासदारपदावर 15 वर्ष ‘अढळ’ राहून विकासाची वाट लावली आहे. वाड्या, वस्त्यांवर, रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत सुविधा देखील खासदार पुरवु शकले नाहीत. त्यामुळे खासदारांनी आयोजित केलेल्या ग्रामसभेला जात आहात. तर, या प्रलंबित प्रश्नांचा जाब खासदारांना विचारा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना केले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. महामार्गाचे काम अर्थवट अवस्थेत आहे. बेरोजगार युवक टाहो फोडत आहेत. शेतकरी वर्ग देशोधडीला लागला आहे. बैलगाडा शर्यतीचे केवळ निवडणुकी पुरते भांडवल केले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नांवर राजकारण करणाऱ्यांची टांगा पलटी करण्याची आता वेळ आली आहे. त्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता देखील सज्ज झाली आहे.

अनेक वर्षे खासदार पदावर ‘अढळ’ राहुनही विकास करता आला नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकासाची 15 वर्षे वाट लावली आहे. खासदार निधी गेला कुठे? याचा जनतेने खासदारांना जाब विचारावा. ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या आजही तहानलेल्या आहेत. पुणे-नाशिक महामार्गाचे काम अर्धवट आहे. पुणे-नाशिक रेल्वेच्या केवळ पोकळ वलग्ना केल्या. 15 वर्षात मतदारसंघातील किती युवती, महिलांचे सबलीकरण केले? स्वतः उद्योजक असूनही मतदारसंघात किती उद्योग आणले? असे प्रश्न जनतेने खासदारांना विचारावेत, असे आवाहन लांडे यांनी केले आहे.

शेतमालाला हमीभाव नाही. पाटा पाणी नाही. बळीराजा दुखावला आहे. निवडणुकीत पुरता बैलगाडा शर्यतीचा खेळखंडोबा केला. चाकण विमानतळ रद्द करून खेड-चाकणच्या विमानतळाला ‘खो’ घातला आहे. रेडझोनचे भिजत घोंगडे आहे. मोशी डेपोचे राजकारण कशासाठी केले? असे विविध प्रश्न शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी विद्यमान खासदारांना विचारावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.