Shirur : …जेव्हा खासदार डॉ. अमोल कोल्हे  आशा सेविकांसोबत सर्वेक्षण करतात

एमपीसी न्यूज – भर दुपारी तळपत्या उन्हात आशा कार्यकर्त्यांकडून वाघोलीतील गोरेवस्तीवर घरोघरी जाऊन  नागरिकांच्या आरोग्य सर्वेक्षणाचे काम सुरू होते.  इतक्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे आगमन होते आणि ते स्वत: आशा कार्यकर्त्यांसमवेत सर्वेक्षण करु  लागले. त्यामुळे  गेले दोन महिने निष्ठेने काम करणाऱ्या आशाताई भारावून गेल्या.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कोल्हे यांनी आज वाघोली येथे भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी गोरेवस्तीवर आशा कार्यकर्त्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. लागलीच त्यांनी गोरेवस्तीवर जाऊन आशा कार्यकर्त्यांसमवेत सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली.

डॉ. कोल्हे यांच्या कृतीनं भारावलेल्या या आशा कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या. ‘गेले दोन महिने आम्ही उन्हातान्हात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतो आहोत, पण आमच्या कामाचे कौतुक कुणीच केलं नव्हतं. आज आमच्या कामाचे चीज झाले. डॉ. कोल्हे यांनी आज आमच्या सोबत सर्वेक्षणाचे काम करून आमच्या कामाची पावतीच आम्हाला दिली. त्यांनी केलेलं कौतुक आमच्या आयुष्यभर लक्षात राहील’ अशा भावना आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटातही धोका पत्करून सर्वेक्षण करण्याचे काम तुम्ही करीत आहात. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी, तुमचे मनोबल वाढविण्यासाठी मी इथे आलो आहे, असे सांगून डॉ. कोल्हे यांनी त्यांच्यासमवेत काही घरांचा सर्वेही केला. त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करु असा विश्वासही त्यांना दिला.

डॉ. कोल्हे यांच्या भेटीमुळे भारावून गेलेल्या आशा कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीच्या कौतुकाने परिसरातील वातावरण भारुन गेले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.