Shirur : शिरुरचा सुभेदार कोण? नेता की अभिनेता ?

शिरुरमध्ये 59.46 टक्के मतदान; आंबेगाव आणि जुन्नरचे मतदान ठरणार निर्णायक

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. मतदारसंघात एकूण 59.46 टक्के मतदान झाले असून तीन पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी पहिल्यांदाच शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांना राष्ट्रवादीचे उमेदवार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी कडवे आव्हान दिले. निवडणूक अतिशय अटीतटीची झाली असून शिरुरचा सुभेदार कोण असणार नेता की अभिनेता ? याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. 23 मे रोजी निकाल असल्याने तोपर्यंत तर्कवितर्क लढविले जाणार आहेत. आढळराव यांच्या आंबेगावात 70.29 टक्के तर डॉ. कोल्हे यांची जुन्नरमधील 64.90 टक्के मतदान निर्णायक ठरणार आहे.

पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेत जाऊन सलग तीनवेळा खासदारकी भूषविली. 2004 मध्ये खेड लोकसभा मतदारसंघातून आढळराव निवडून आले. 2009 मध्ये मतदारसंघाची पुर्नरचना होऊन शिरुर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. आढळराव यांनी 2009, 2014 मध्ये देखील सहजरित्या शिरुरमधून बाजी मारत हॅटट्रिक मारली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी शिवसैनिकालाच पक्षात घेत आढळराव यांच्यासमोर तगडा उमेदवार दिला.

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी दिली. दूरचित्रवाणीवरील मालिकेमुळे प्रकाशझोतात असलेले डॉ. कोल्हे यांची मतदारसंघात लोकप्रियता आहे. तरुण, स्वच्छ चारित्र्य, नवीन चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याने आढळराव यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. डॉ. कोल्हे आपले प्रतिस्पर्धी नसून दिलीप वळसे पाटील हेच आपले प्रतिस्पर्धी असल्याचे आढळराव सातत्याने सांगत राहिले.

शिरुर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसर हे सहा मतदारसंघ येतात. डॉ. अमोल कोल्हे हे जुन्नरचे रहिवाशी आहेत. त्यांच्या तालुक्यात एक लाख 93 हजार 965 मतदारांनी आपला हक्क बजाविला असून 64.90 टक्के मतदान झाले आहे. जुन्नर मधून जास्तीत-जास्त मतदान स्थानिक असल्याने डॉ. कोल्हे यांच्या पारड्यात पडले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवाजीराव आढळराव यांच्या आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच एक लाख 97 हजार 52 मतदारांनी आपला हक्क बजाविला असून 70.29 टक्के मतदान झाले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि आढळराव दोघेही आंबेगाव तालुक्यातील आहेत. लोकसभेला आढळराव आणि विधानसभेला वळसे-पाटील यांच्या पाठीमागे आंबेगावातील मतदार आजपर्यंत राहिला आहे. त्यामुळे यावेळी सर्वाधिक मतदान करुन मतदारांनी कौल कोणाच्या बाजुने दिला आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार असून आंबेगावातील मतदान निर्णायक ठरणार आहे.

खेड-आळंदी मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आळंदी मतदारसंघात दोन लाख 2 हजार 740 मतदारांनी मतदान केले असून 62.76 टक्के मतदान झाले आहे. मतदान कोणाच्या पारड्यात पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात दोन लाख 27 हजार 541 मतदारांनी मतदान केले असून 61.52 टक्के मतदान झाले आहे. येथेही भाजपचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भोसरी मतदारसंघातील दोन लाख 37 हजार 767 मतदारांनी मतदान केले असून 57.48 टक्के मतदान झाले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांना तिकीट नाकारल्याने काही दिवस ते नाराज होते. त्यामुळे भोसरीतून कोणाला मताधिक्य मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हडपसर मतदारसंघातून दोन लाख 33 हजार 316 मतदारांनी आपला हक्क बजाविला असून सर्वांत कमी 47.84 टक्के मतदान झाले आहे. हडपसरमध्ये भाजपचा आमदार असून राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष, दोन माजी महापौर हे प्रचारात सक्रिय होते. त्यामुळे हडपसरवासियांचा कौल कोणाकडे झुकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.