Shirur: सव्वा लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार – शिवाजीराव आढळराव-पाटील

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून मला मताधिक्य मिळेल. माझा विजय निश्चित असून एक लाख ते सव्वा लाख मताच्या फरकाने विजयी होऊ, असा आत्मविश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना व्यक्त केला.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया उद्या (गुरुवारी) सकाळी आठ वाजल्यापासून बालेवाडी येथे होणार असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला आढळराव यांनी विजयाचा दावा केला आहे. आढळराव यांना त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान दिले होते. डॉ. कोल्हे आणि आढळराव यांच्यातील लढत लक्षवेधी झाली. आढळराव यांच्यासमोर गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी डॉ. कोल्हे यांच्या रुपाने पहिल्यांदाच तगडे आव्हान होते. त्यामुळे शिरुरच्या निकालाकडे राज्यासह मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

  • पुढे आढळराव म्हणाले, शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळेल. त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. आंबेगाव, शिरुर, खेड-आळंदी, जुन्नर, हडपसर आणि भोसरी हे सहा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात आहेत. त्यामध्ये आंबेगावमधून सुमारे 30 ते 35 हजार, भोसरीतून 50 हजार, हडपसर मतदारसंघातून 20 हजाराची आघाडी मिळेल. शिरुरमधून 10 आणि खेड-आळंदीमधून 10 हजाराची आघाडी असेल. तर, जुन्नर विधानसभा मतदारसंघातून सम-समान मते मिळतील.

शिरुरमधील अभिनेता आणि नेत्यामधील निवडणूक लक्षवेधी झाली. डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांना टफ फाईट दिली. आढळराव निवडून आल्यास त्यांची चौथी टर्म असेल. दरम्यान, आढळराव 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सव्वातीन लाखाच्या मताधिक्याने निवडून आले होते. यावेळी एक लाख ते सव्वा लाख मताच्या फरकाने निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून त्यांचे दोन लाखाने मताधिक्य घटण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like