Chinchwad News : गुंड गजा मारणे रॅली प्रकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अटक

एमपीसी न्यूज – कुख्यात गुंड गजा मारणे याची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याची तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत रॅली काढण्यात आली. याबाबत पिंपरी चिंचवड मधील तळेगाव आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

या रॅलीत सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. तसेच पोलिसांकडून रॅलीत वापरलेली वाहने देखील जप्त केली जात आहेत. या रॅलीत पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला तसेच शिवसेनेच्याही एका तालुकाध्यक्षाला अटक केली आहे.

गुंड गजा मारणे याची 15 फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यावेळी त्याने 300 अलिशान वाहनांच्या ताफ्यासह तळोजा कारागृह ते पुणे अशी मिरवणूक काढली. याप्रकरणी तळेगाव आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात दरोडा आणि रॅली काढल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

या रॅली प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 59 जणांना अटक केली आहे. तर रॅलीमध्ये सहभागी झालेली 23 अलिशान वाहने जप्त केली आहेत. रॅलीसाठी पुणे, सातारा, नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड शहरातील सात वाहने सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष संजय पिसाळ आणि शिवसेनेच्या एका तालुका अध्यक्षाचाही समावेश आहे. यामुळे गजा मारणे याचे राजकीय कनेक्‍शनही उघड झाले आहे.

गजा मारणे याला सातारा जिल्ह्यातून अटक केल्याचे सांगितले जात आहे. मात्र तो पोलिसांना शरण आला असल्याचे बोलले जाते. त्याला शरण आणून देण्यात सातारा जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादीचा एक नेता आणि पुणे शहरातील भाजपच्या एका नेत्याने महत्वपूर्ण भूमिका बजावल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

गजा मारणे रॅलीमधील बहूतांश वाहने राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजकांची आहेत. त्या वाहन मालकांना पोलीस बोलावून अटक करीत आहेत. सुरवातीला वाहन मालक “तो मी नव्हेच’ची भूमिका घेतात. मात्र फुटेजमधील वाहन दाखविल्यावर ते आपसूक भूमिका बदलतात. रॅलीसाठी गाड्या पुरवणाऱ्यांमध्ये मोक्काची कारवाई झालेल्या दोन गुंडांचा समावेश आहे. एजाज पठाण आणि राहुल दळवी अशी त्यांची नावे आहेत. राहुल दळवी याने मर्सिडीज आणि स्कोडा अशी वाहने पुरवली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.