Sanjay Nirupam : शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहायची भूक – संजय निरुपम 

एमपीसी न्यूज – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत आणि भाजपकडून या भेटीमागील कारण स्पष्ट केलं असले तरीही या भेटीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. शिवसेनेच्या कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक लागल्याचे निरुपम म्हणाले आहेत.

राऊत यांच्या भेटीबद्दल संजय निरुपम यांनी ट्विट केलं आहे. संजय निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘असं वाटतंय की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्यांनाच खाते. ही दुर्भावना नसून वास्तविकता आहे.’ हॅशटॅग ग्रॅन्ड हयात असे ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, फडणवीस सध्या राज्याचे विरोधी पक्षनेता असून माजी मुख्यमंत्रीही आहेत. भाजपने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे शक्य झाली नाही, असे संजय राऊत फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर म्हणाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.