Pimpri : ‘वृक्षवेलींच्या स्वरूपात शिवसेना आपल्या घरात’

शिवसेना राबविणार पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त पर्यावरण रक्षण करणारा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात ‘वृक्षवेलींच्या स्वरूपात शिवसेना आपल्या घरात’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यांच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना 54 हजार रोपांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शहराध्यक्ष योगेश बाबर यांनी सांगितले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेनेच्या वतीने व महिला आघाडीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम, रक्तदान शिबिर, प्राधिकरण येथील मुकबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेत शालेय साहित्य वाटप, दिव्यांग संस्था व अनाथ आश्रमात फळ वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.

शहर महिला संघटक ॲड. उर्मिला काळभोर यांनी सांगितले की, पिंपरीतील डीवाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात महिलांसाठी मोफत मॅमोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन केलेले आहे. त्याच्या आतापर्यंत पाचशेहून जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. या पत्रकार परिषदेस नगरसेवक प्रमोद कुटे, निलेश बारणे, रेखा दर्शिले, अश्विनी चिंचवडे, चिंचवड विधानसभा संघटक अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने, अमित उबाळे, आशुतोष चव्हाण, समीर पवार, धीरज वाळुंज, शशांक राणे, प्रतिक कांबळे, निखिल थोरात, किरण पाटील, प्रज्वल भोसले, मनिष सगळगिरे, राहुल लादे आदी.

शिवसेना प्रमुख, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिकवण प्रत्यक्ष अंमलात आणून हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानिमित्त मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी परिसरात पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी जनजागृती करीत 54 हजार रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (27 जुलै ) सकाळी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोप भेट देऊन करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन रोपांचे वाटप करण्यात येईल. पर्यावरण संतुलन आणि संवर्धन ही काळाची गरज असून, त्यासाठी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक झाडं लावणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा योजना राबविणे गरजेचे आहे. पिंपरी परिसरातील नागरिकांना वृक्षांचे वाटप करून, त्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. परिसरातील सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन नगरसेवक भोसले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.