Pune : शिवसेना 10, तर भाजपच्या 5 रुपयांच्या थाळीची खिल्ली

मी 10 रुपयात पाण्याची बाटली देणार नाही - राज ठाकरे

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या 10 तर, भाजपच्या 5 रुपयांच्या थाळीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज खिल्ली उडवली. मी 10 रुपयांत पाण्याची बाटली देणार नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. मी जे बोलतो ते करतो. जे माझ्याकडून होणार नाही, ते मी बोलणार नाही. जनतेमध्ये आज प्रचंड राग आहे. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी या महाराष्ट्राला प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. अन्यथा तुमच्यावर वरवंटा फिरल्या शिवाय राहणार नाही. हा धोका रोखण्यासाठी तुमचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी मनसेला विरोधी पक्ष बनवा, असे आवाहनही राज यांनी यावेळी केले.

हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आज आयोजित केली होती. बंटर हायस्कूल येथे रात्री ही सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम रद्द केले. त्याबद्दल अभिनंदन. मग काश्मीर पंडित कधी काश्मीरला जाणार, महाराष्ट्रात या कलमाचा प्रचार करण्याची गरज नाही. काल मोदी यांनी या कलमाचा पुण्यात उल्लेख केला होता. त्यावर राज यांनी टीकास्त्र सोडले.

राज्यकर्त्यांना ही निवडणूक नागरिकांना गांभीर्याने घेऊच द्यायची नाही. सध्या मंदीचे सावट आहे. पुढे ते आणखी गंभीर होणार आहे. महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती उद्भवनार असल्याचा इशारा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला आहे. त्यांचे हे भाष्य धडकी भरवणारे आहे. देशात मंदीला सुरुवात झाली आहे. ऑटो सेक्टरमधून लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. नवीन नोकऱ्या मिळण्याची शाश्वती नाही. बँक बंद पडत आहेत. मागील केवळ 5 वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दर 3 तासांनी 1 आत्महत्या होते.

शेती, उद्योगधंदे नीट चालू नाही. सर्वच सत्ताधारी झाले तर तुमच्या बद्दल कोण बोलणार? यासाठी कणखर विरोधी पक्षासाठी मतदान करा. भारताच्या इतिहासात प्रथमच कोणीतरी विरोधी पक्ष बनविण्याची मागणी करीत आहे. त्यानंतर पुढचे कार्य आमच्यावर सोपवा, असेही राज यांनी ठणकावून सांगितले. तर, वसंत मोरे शब्द पाळणारा माणूस आहे. या मतदारसंघाचे नाव हडपसर आहे. तो देणारा आहे. हडप करणारा नाही, असे सांगताच नागरिकांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. 21 ऑक्टोबरला रेल्वेइंजिन समोरील बटन दाबण्याचे आवाहन राज यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like