Pimpri News : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – दररोज वाढत जाणारे पेट्रोल, डिझेलचे दर आणि घरघुती गॅस दरवाढीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने दरवाढी विरोधात आज (शुक्रवारी) तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, मधुकर बाबर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, बशीर सुतार  आदी शिवसैनिक सहभागी झाले आहेत.

पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. पेट्रोल 92 रुपयांवर गेले आहे. तसेच घरगुती गॅस सिलेंडर 23 रुपयांनी वाढला आहे. यामुळे महिलांचे नियोजन बिघडले आहे. केंद्र सरकार केवळ उद्योगपती धार्जिणे आहे. शेतकरीविरोधी आहे, असा आरोप शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केला. ”अक्कड बक्कड बंबे बो, 80,90 पुरे 100 अच्छे दिन”, ”मोदी सरकारचे कोणाचे अदानी, अंबाणीचे”, ”पेट्रोल, डिझेल दरवाढ करणा-या मोदी सरकारचा धिक्कार असो”, ”गॅस सिलेंडर दरवाढ करणा-या सरकारचा धिक्कार असो” अशा जोरदार घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.