Pune : पाणी मिळण्यासाठी शिवसेनेचे आक्रोश आंदोलन

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर मतदारसंघातील गोखलेनगर, जनवाडी भागात पाणी मिळण्यासाठी शिवसेनेतर्फे आज महापालिका आवारात आक्रोश आंदोलन करण्यात आले. शिवसेना शिवाजीनगर समन्वयक प्रवीण दत्तू डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला होता.

पाण्याची वेळ बदलण्यात यावी, गढूळ पाण्याची समस्या सोडविण्यात यावी, पाण्याचे प्रेशर वाढविण्यात यावे, दर गुरुवारची अघोषित पाणीकपात रद्द करण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या प्रशासनाचे करायचे काय, वस्त्रहरण दुसरे काय? जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दिनांक 4 फेब्रुवारी 2019 पासून गोखलेनगर, जनतावसाहत, जनवाडी, रामोशीवाडी, पीएमसी कॉलोनी, लाल चाळ, हिरवी चाळ, पाच पांडव सोसायटी, गोलघर, वैदूवाडी, आशानगर, बहिरटवाडी, नीलज्योति, चतुश्रूंगी या परिसरात पाणी आलेच तर खूप कमी दाबाने, गढूळ येते.

तसेच खूप उशिराने येत असल्याचे प्रवीण डोंगरे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही पाणी मिळण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले होते. वर्षभरापासून पाठपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, शासनाकडून फक्त खोटी आश्वासनेच मिळत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आता मात्र आमची आणि या भागातील ५000 कुटुंबाची सहनशक्ती संपली आहे. तातडीने चांगल्या दाबाने पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.