Pune News : तक्रारदारांची नावे उघड करण्याचे प्रकार थांबवा, शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज : अनेकदा एखादी घटना घडली अथवा गुन्हा घडल्यास जागरूक नागरिक सर्वप्रथम नियंत्रण कक्षाला 100 नंबरवर फोन करून माहिती देतात. अशा वेळी संबंधित व्यक्तीचे नाव गुप्त ठेवणे गरजेचे आहे. मात्र, पोलिसांकडून घटनास्थळी आल्यानंतर सर्रासपणे तक्रारदाराचे नाव उघड करतात.

त्यामुळे पोलिसांना गुन्ह्याची माहिती देणे हा अपराध करणे किंवा विनाकारण दुष्मनी करून घेणे, अशी भावना संबंधित माहिती देणाऱ्या व्यक्तीची होते. असे प्रकार रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशीद आणि संघटक रावसाहेब थोरात यांनी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर आणि पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना निवेदन दिले आहे.

मोरेवस्ती परिसरात गुन्हेगारी कृत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये अप्ल्पवयीन टोळक्यांचा उपद्रव चिंतेचा विषय बनला आहे. महिला, मुलींची छेडछाड, त्यांचा पाठलाग करणे आदी प्रकार राजरोस घडत आहेत. रात्री अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना अडवून त्यांच्याकडील रोकड आणि मुद्देमाल हिसकावून घेणे, त्यांना मारहाण करणे असे प्रकारही अधूनमधून घडत आहेत. या भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी परिसरात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी शिवसेनच्या वतीने करण्यात आली आहे.

पोलीस गस्त वाढवा

मोरेवस्ती, साने चौक, म्हेत्रे वस्ती अष्टविनायक चौक ते वाघू साने चौक या रस्त्यावर छेडछाड करण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी मद्यपींची टोळकी अंधाराचा फायदा घेत खुलेआम मद्यपान करत बसलेली असतात. त्याचा महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. एकूणच मोरेवस्ती परिसरात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. यासाठी या परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी तसेच रात्रीच्यावेळी पोलीस गस्त वाढविणे गरजेचे झाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.