ED Summons Sanjay Raut : शिवसेनेची अडचण वाढली! खासदार संजय राऊत यांना ईडीची नोटीस

28 जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी ईडीकडून समन्स

एमपीसी न्यूज – राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना पुरती भरडून निघाली आहे. एकीकडे शिवसेना आमदारांच्या बंडखोरीने अखेर न्यायालय गाठले आहे, तर दुसरीकडे ईडी संकट पुन्हा घिरट्या घालू लागले आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut ED Summons) यांना ईडीने जमीन घोटाळा प्रकरणी समन्स पाठवले आहे. उद्या (दि. 28 जून) ईडी चौकशीसाठी राऊत यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील या सत्ताकारणाला आता वेगळेच वळण मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

महाराष्ट्रात शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडीचे सरकार पुरते संकटात सापडले आहे. संख्याबळ कमी असल्याने सरकार पडणार अशी व्यक्तव्ये समोर येत आहेत, सरकार पुन्हा रुळावर कसे आणणार यावर महाविकास आघाडीचे अनेक विचार मंथन होत आहेत.  दरम्यान, उरलेल्या शिलेदारांसोबत पक्षाचा गाडा हाकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला आता ईडीने (Sanjay Raut ED Summons) चांगलाच दणका दिला आहे.

‘पक्षाचे भूमिका ठाम मांडणारे’ अशी ओळख निर्माण झालेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मागे आता ईडीची पिडा सुरू झाली आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमिन घोटाळा प्रकरणी ईडीकडून राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आताच्या प्रतिकूल परिस्थितीत ईडीचा तिढा पुन्हा वाढल्याने राऊत यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, ईडीची नोटीस अद्याप आपल्याला मिळाली नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Chain Snatching : पालखीचे दर्शन घेत असताना हिसकावली सोन्याची चैन; गुन्हा दाखल

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

गुरू आशिष बिल्डरने जाॅंईंट व्हेंचर अंतर्गत 2006 साली पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. प्रकल्प 2008 साली सुरू झाला परंतु दहा वर्षानंतर पत्राचाळ प्रकल्प जैसे थे असल्याचे दिसून आले. चाळीचा कोणताच पुनर्विकास झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मूळ 678 रहिवाशांसहित म्हाडाच्या घरांबाबत सुद्धा बिल्डरने फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, विक्रीचे क्षेत्र बिल्डरने सात त्रयस्त विकासकांना विकल्याची धक्कादायक बाब समोर आली. जवळपास 1 हजार 34 कोटींना म्हाडाला बिल्डरने फसवले होते. या गुरू आशिष कंपनीचे संचालक राकेश वाधवान आहेत आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांचे वाधवान यांच्याशी चांगले संबंध आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राकेश वाधवान आणि प्रविण राऊत यांची नावे प्रामुख्याने आली. मध्यंतरी प्रवीण यांना अटक होऊन सुटका सुद्धा झाली मात्र पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांना अटक करण्यात आली.

या घटनाक्रमात प्रवीण राऊत यांच्या खात्यातून 55 लाख संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले, त्यामुळे या घोटाळ्यात संजय राऊत यांचा सुद्धा सहभाग असू शकतो या संशयातून ईडीने राऊत यांना पुन्हा समन्स बजावले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.