Pimple Saudagar: ‘shivade i am sorry’चे फलक लावणारा प्रेमवीर सापडला!

प्रेयसीशी भांडण झाल्याने माफी मागण्यासाठी लावले होते फलक 

बेकायदेशीर फलक लावल्यामुळे पालिका करणार कारवाई 

एमपीसी न्यूज – उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात ‘shivade i am sorry’ असा मजकूर लिहिलेले फलक आज सकाळपासून झळकत होते. हे फलक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. अखेर हे फलक लावणारा तरुण सापडला असून आपल्या प्रेयसीशी भांडण झाल्याने तिची माफी मागण्यासाठी 300 फलक लावल्याचे समोर आले आहे. त्याची प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने त्याने फलक लावले होते. दरम्यान, बेकायदेशीर फलक लावल्यामुळे पालिका आता कारवाई करणार आहे.  

पिंपळेसौदागर या परिसरात उच्चभ्रू वसाहतींची संख्या अधिक आहे. संगणक अभियंते या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर  ‘shivade i am sorry’ असा मजकूर असलेले फलक लावले होते. कल्पतरु चौक ते पिंपळेसौदागर या परिसरात सुमारे 300 फलक लावले होते. हे फलक संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरले होते.

पोलिसांनी तपास केल्यानंतर फलक लावणारा प्रेमवीर सापडला आहे. पुणे, घोरपडी परिसरातील एका 25 वर्षीय तरुणाचे त्याच्या प्रेयसीशी भांडण झाले होते. त्याची प्रेयसी आज मुंबईहून पुण्याला येणार होती. त्यामुळे त्याने प्रेयसीची माफी मागण्यासाठी चिंचवड, केशवनगर परिसरातील एका मित्राला माफीचे फलक लावण्याचे सांगितले होते. माफी मागण्यासाठी सुमारे 300 फलक लावल्याचे निष्पन्न झाले आहे. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, बेकायदेशीर फलक लावल्यामुळे पालिका कारवाई करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.