Chinchwad :  मातृभक्ती व राष्ट्रनिष्ठा या गुणांनी शिवाजी व संभाजी या दोन्ही छत्रपतींनी महाराष्ट्र घडवला – प्रदीप कदम

एमपीसी  न्यूज –  आज देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे याच्या मागचे कारण म्हणजे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांनी घडवलेला आहे.  मातृभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा या गुणांनी शिवाजी आणि संभाजी या दोन्ही छत्रपतींनी महाराष्ट्र घडवला!” असे मत प्राचार्य प्रदीप कदम यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. 

चिंचवड येथील साई मंदिर प्रांगणात  पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेत ‘छत्रपतींनी घडवलेला महाराष्ट्र’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना प्राचार्य प्रदीप कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक शंकर पांढारकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रघुशेठ गावडे तसेच प्रकाश रंधे, प्रशांत मोरे, अरविंद वाडकर, प्रदीप गांधलीकर उपस्थित होते.

प्राचार्य प्रदीप कदम म्हणाले की, “जगातील सर्वात सुंदर, सर्वोत्तम, उदात्त, आदर्श, चारित्र्यसंपन्न आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या शिवरायांचे चरित्र आम्हाला अनेक गोष्टी शिकवते; परंतु यासाठी कोणत्याही जातीची झापडं लावून शिवचरित्राचा अभ्यास करण्यापेक्षा सर्वांगीण बाजूंनी त्याचे चिंतन केले पाहिजे. संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीनंतर सुमारे साडेतीनशे वर्षे महाराष्ट्र दिशाहीन झालेला होता. परकीय आक्रमणे आणि पातशाह्यांनी महाराष्ट्रभूमी दैन्यावस्थेत गेलेली होती. महिलांवरील अत्याचार, सामान्य रयतेची पिळवणूक यामुळे महाराष्ट्रात अराजक माजलेले होते.

या काळात महाराष्ट्रातील मोठे सरदार आपापसात झुंजत होते. अशा परिस्थितीत जिजाऊंच्या मनात अन्यायाविरुद्धची चीड निर्माण झाली. जिजाऊंनी शहाजीराजांच्या मनातही जुलमी पातशाह्यांचा सूड घेण्याचे स्फुलिंग चेतवले. सर्व सुखसोयींकडे पाठ फिरवून जिजाऊ छोट्या शिवबांसह पुण्यात आल्या, तेव्हा पुण्याची अवस्था दयनीय होती. याच काळात  संत तुकोबा आपल्या अभंगांतून जनजागृती करीत होते. बाल शिवबांनी एकदा तुकोबांचे कीर्तन ऐकले आणि त्यांच्या मनात ईश्वरभक्तीत आपले जीवन व्यतीत करावे अशी भावना निर्माण झाली; परंतु जिजाऊंनी शिवबा आणि तुकोबा अशी भेट घडवून आणली.

तुम्ही ईश्वरभक्ती करून देवर्षी होण्यापेक्षा राज्य करून राजर्षी व्हा, असा उपदेश तुकोबांनी शिवबांना केला. शिवाजी राजांनी स्वर्गापेक्षाही आईला श्रेष्ठ मानले आणि आपल्या सवंगड्यांची अचूक पारख, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, अखंड सतर्कता, अंगरक्षकांची योग्य निवड, सर्वधर्मसमभाव वृत्ती, परस्त्री मातेसमान मानणे, गुणग्राहकता, वेळेचे योग्य नियोजन असे अनेक गुण मातेकडून महाराजांनी आत्मसात करून स्वराज्याची उभारणी केली.

राजकारण आणि युद्धशास्त्र या पलीकडे जाऊन मैत्री जपणारे शिवाजी महाराज आपल्याला अनेक प्रसंगांत दिसून येतात. जिजाऊ आणि शिवबांनी अठरापगड जातीतल्या मावळ्यांना जीव लावला म्हणून स्वराज्यासाठी मावळेदेखील जिवाची बाजी लावत होते. संभाजीराजांनी आरमार भक्कम व्हावे म्हणून जंगेखानाला स्वराज्यात आणले. शंभुराजांनी जगातला पहिला बालकामगार विरोधी कायदा केला. शिवाजी आणि संभाजी यांचे मन, मनगट आणि मेंदू जिजाऊंनी स्वराज्यासाठी सिद्ध केले होते म्हणून शिवाजी आणि संभाजी यांच्या एकूण पंचावन्न वर्षांच्या काळात महाराष्ट्र घडला.

छत्रपती शिवाजी आणि संभाजीराजांच्या नंतरही गवताला भाले फुटावे असे चैतन्य मराठा सरदारांमध्ये निर्माण झाले आणि महाराष्ट्र अखंड राहिला!” अतिशय ओघवत्या शैलीत इतिहासाचे अनेक प्रसंग, अभंग, कविता उद्धृत करीत प्राचार्य प्रदीप कदम यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले.शंकर पांढारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “व्याख्यानमालेच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडू शकतात!” असा विश्वास व्यक्त केला.राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. शंकर काळभोर, गणेश पागळे, प्रभाकर ढोमसे, आशा पागळे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. सुभाष पागळे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.