Talegaon Dabhade : छत्रपती हे धर्मवीर असण्यापूर्वी स्वराज्यवीर- खा.संभाजीराजे भोसले

तळेगाव दाभाडे इतिहास ते वर्तमान ग्रंथाचे प्रकाशन

तळेगाव दाभाडे- छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे धर्मवीर तर होतेच पण अगोदर ते स्वराज्यवीर आणि स्वातंत्र्यवीर होते. साडेतीनशे वर्षापुर्वी भोसले राजघराण्याचा विश्वास संपादन करत तळेगावच्या दाभाडे घराण्याने छत्रपतींच्या तीन गादयांना सेवा दिली असे गौरवोद्गार खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी काढले. बुधवारी (ता. 15) सायंकाळी तळेगाव दाभाडे शहराची संकलनात्मक समग्र माहिती असलेल्या ‘तळेगाव दाभाडे- इतिहास ते वर्तमान’ संदर्भग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी आमदार दिगंबर भेगडे, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, चंद्रसेनराजे दाभाडे, उमाराजे दाभाडे, अंजलीराजे दाभाडे, तेजलराजे दाभाडे, वृशालीराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, ग्रंथसंपादक सुरेश साखवळकर, बाळासाहेब जांभुळकर, पांडुरंग बलकवडे, डाॅ. रामचंद्र देखणे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले, “राजांच्या मोठेपणाचे मूळ सेनापतींच्या कर्तृत्वात आहे.नव्या पिढीला इतिहास समजण्यासाठी सुटीच्या दिवशी पर्यटनस्थळी न जाता ऐतिहासिक स्थळी जाऊन प्रेरणा घ्यावी. किल्ल्यांची पुनर्बांधणी करुन इतिहास गाडायचा नाही तर त्याचे संवर्धन गरजेचे आहे. महाराष्ट्रातील १५ किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दीडशे कोटींचा केंद्रीय निधी आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच इतिहासाला सोबत घेऊन वर्तमानातील जीवनात पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पांडुरंग बलकवडे, डाॅ. रामचंद्र देखणे, सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, ग्रंथसंपादक सुरेश साखवळकर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी देखील आपले विचार मांडले.

_MPC_DIR_MPU_II

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ” कर्तृत्वाने गजबजलेल्या अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा तळेगावशी संबंध आहे. स्वराज्य वाचवण्यासाठी तळेगावच्या दाभाडे घराण्याने जीव पांघरला. तळेगावच्या कर्तृत्व छाती फाडून टाकणारे असून तळेगावच्या कीर्तीमंदिर झाले पाहिजे” अशा शब्दात पुरंदरे यांनी तळेगावच्या ऐतिहासिक कर्तृत्वाचा उल्लेख केला.

ग्रंथनिर्मिती समितीचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्राचीन, पुरातन अजरामर इतिहास, वर्तमानात संदर्भ म्हणून प्रकाशित व्हावा याद्वारे तरूणांना प्रेरणा मिळावी ह्या एकमेव उद्देशाने प्रकल्पाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. सतत तीन वर्षे 40 सदस्यांचे सहकार्याने हा “प्रकल्प” ‘तळेगाव दाभाडे शहर इतिहास ते वर्तमान या संदर्भ ग्रंथाचे रूपाने आज प्रकाशित करण्यात आला, याचा आम्हाला सार्थ आनंद होत आहे, दाभाडे घराण्याच्या वैभवशाली पराक्रमाचे स्मारक व्हावे ही कल्पना पुढे आली, ह्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे, असेही भेगडे यांनी यावेळी सांगितले.

विविध संस्था व व्यक्ती यांनी या संदर्भ ग्रंथासाठी जाहिरातरूपाने बहुमोल सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे
हरिष घाटपांडे यांनी मुद्रण, विजय देशपांडे यांनी मुद्रीकाशोधन, प्रणाली जोर्वेकर/शेंडे यांनी मुखपृष्ठ तर संदीप धनाड यांनी जाहिरातींचे रेखाटन केले. त्याबद्दल या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शाहीर हेमंत मावळे यांच्या पोवाडयाने कार्यक्रमास सुरुवात झाली. शिवशंभू समूहशिल्पास अभिवादन करण्यात आले. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. जयंत जोर्वेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन संतोष खांडगे, नंदकुमार शेलार, डाॅ.प्रमोद बोराडे, दीपक बीचे, अतुल पवार आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.