Shivajinagar Crime News : वाईन शॉपचे शटर उचकटून तीन लाखांची रोकड लंपास

एमपीसीन्यूज : पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील दीप बंगला चौकात असणाऱ्या महाराजा वाईन्सचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल दोन लाख 80 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाईनचे मॅनेजर कश्यप रवासीय (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप बंगला चौक येथे महाराजा वाईन शॉप आहे. सोमवारी रात्री फिर्यादी हे वाईन शॉप बंद करून घरी निघून गेले. दरम्यान आज, मंगळवारी सकाळी या वाईन शॉपच्या शेजारी असणाऱ्या एका हॉटेल मालकाने फिर्यादी यांना फोन करून तुमच्या शॉपचे शटर उचकटलेले असल्याचे सांगितले.

त्यानंतर फिर्यादी यांनी दुकानात येऊन पाहिले असता शटर उचकटलेले होते. तसेच वाईन शॉप तिजोरी आणि ड्रावरमधील दोन लाख 80 हजार रुपयांचे रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती.

दरम्यान, हा सर्व प्रकार या दुकानात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तोंडाला मास्क लावलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम लंपास केली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.