Bhosari : महेश लांडगे यांना विक्रमी मतांनी निवडून आणणार – शिवाजीराव आढळराव पाटील

विरोधकांच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नका;पुणे जिल्ह्यात महायुतीत सर्वात आधी समन्वय व मनोमिलन भोसरीतच

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात शिवसेना भाजप महायुतीत सर्वात आधी समन्वय व मनोमिलन भोसरीतच झाले. मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असताना आमदार महेश लांडगे यांनी उभे राहून मनापासून माझे काम केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक शिवसैनिक उत्साहाने कामाला लागला आहे. आमदार महेश लांडगे यांना पुणे जिल्ह्यात विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे, असे मत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. विरोधकांच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत खासदार आढळराव पाटील बोलत होते. यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे, शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा मतदारसंघ प्रमुख धनंजय आल्हाट, कामगार नेते इरफान सय्यद आदी उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, शिवसेना नाराज असल्याचे विनाकारण पसरवले जात आहे. कोणीही नाराज नाही सर्वजण उत्साहाने काम करत आहेत. महायुतीत पुणे जिल्ह्यात सर्वात आधी समन्वय आणि मनोमिलन भोसरीतच झाले आहे. प्रत्येक शिवसैनिक समन्वयाची बैठक होण्याआधीच कामाला लागला आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी उभे राहून व मनापासून माझे काम केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना युतीधर्माचे पालन करण्यात कुठेही व किंचितही कमी पडणार नाही, असा विश्वास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

भोसरी मतदारसंघात जून्नर, आंबेगाव, खेड भागातील रहिवासी मोठ्या प्रमाणावर राहत आहेत. हे सर्व रहिवासी सुद्धा निश्चितपणे आमदार महेश लांडगे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. आमदार महेश लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी होतील तसा निर्धार शिवसैनिकांनी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.